मुंबईतील ४० टक्के तरुण ही तणावग्रस्त?

0

मुंबई:स्वप्नांचं शहर अशी ओळख असलेल्या मुंबईतील ४० टक्के तरुणाई ही तणावग्रस्त असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. अवघ्या २० ते ३० या वयोगटातील ही तरुणाई तणावाखाली असून यातील अनेकांच्या पालकांना त्यांच्या मुलांच्या मानसिक स्थितीची साधी कल्पनाही नाही ही अत्यंत चिंताजनक बाबही यानिमित्तानं उघड झाली आहे.

‘पोदार इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’ ने जवळपास ४०० तरुण आणि ४०० तरुणींशी सहा महिने संवाद साधला. त्यावेळी स्वतःच्या दिसण्याबद्दल ७९ टक्के तरुणी आणि ६८ टक्के तरुण समाधानी नाहीत. ६८ टक्के तरुणींना आणि ४८ टक्के तरुणांना ‘कॉस्मेटिक सर्जरी’ करून स्वतःचा लूक बदलायची इच्छा आहे. शहरातील ३८ टक्के तरुणांना ते कायम तणावाखाली असतात, असं वाटतं.

तर २२ टक्के तरुणांना कधी-कधी तणावाचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे, ४९ टक्के तरुणी कायम तणावाखाली असून २२ टक्के तरुणींनी कधी-कधी तणावाखाली येत असल्याची कबुली दिली. सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे हे सुद्धा एक तणावाचे कारण आहे. ७९ टक्के मुली आणि ६८ टक्के तरुण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्यातील ५० टक्के तरुण-तरुणी ५ ते १० तास वेळ दररोज सोशल मीडियावर घालवतात, असंही या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.