मुंबईतील 17 हॉटेल्स अस्वच्छ, ’एफडीए’ने पाठवली नोटीस

0

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)ने मागील 15 दिवसांत राबवलेल्या विशेष मोहिमेंतर्गत मुंबईतील 17 अस्वच्छ हॉटेल, उपहारगृहांना नोटीस बजावली आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार स्वच्छ आणि सुरक्षित जागीच अन्न शिजवले जावे यासह स्वच्छेतेच्यादृष्टीने अनेक नियम हॉटेल व्यावसायिकांना बंधनकारक करण्यात आले आहे. या कायद्याचे पालन केले जाते की नाही यादृष्टीने ’एफडीए’कडून दैनंदिन तपासणी होत असते. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबवत हॉटेल आणि उपहारगृहातील स्वच्छतेची तपासणी केली जाते. त्यानुसार गेल्या 15 दिवसांपासून मुंबई विभागाने या मोहिमेला सुरूवात केली आहे.

52 हॉटेलच्या तपासण्या
पावसाळी विशेष मोहिमेद्वारे ’एफडीए’ने मुंबईतील 52 हॉटेल-उपहारगृहांची तपासणी केली आहे. त्यानुसार 17 हॉटेल-उपहारगृहांकडून अन्न सुरक्षा कायद्याचा भंग होत असल्याचे समोर आले आहे. अस्वच्छ जागी अन्न शिजवणे, स्वच्छतेचे नियम न पाळणे, ड्रेनेजची योग्य सुविधा नसणे, माशा, मच्छरांचे साम्राज्य अशा एक ना अनेक कारणांखाली या 17 हॉटेल, उपहारगृहांवर कारवाई केल्याचे ’एफडीए’ने सांगितले आहे. या 17 हॉटेल-उपहारगृहांना नोटीस बजावत स्वच्छतेच्यादृष्टीने सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. ही विशेष मोहीम अशीच सुरू राहणार असल्याने या कारवाईत आणखी हॉटेल, रेस्टॉरंटचा समावेश होण्याची शक्यता आहे.

अन्यथा परवाना रद्द
नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांत स्वच्छतेच्यादृष्टीने उपाययोजना या हॉटेल-उपहारगृह मालक-चालकांनी न केल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांचा परवाना तात्पुरता वा कायमस्वरूपी रद्द होण्याचीही शक्यता आहे.