मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही!

0

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या कर्मचार्‍यास चपलेने मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड दोन आठवड्यानंतर गुरुवारी संसदेत पोहोचले. विमानातील मारहाणप्रकरणी त्यांनी सभागृहात निवेदन केले. विनम्रता आपल्या स्वभावातच असून, आपण संसदेची माफी मागण्यास तयार आहोत. परंतु, एअर इंडियाच्या मुजोर अधिकार्‍याची माफी मागणार नाही, अशी भूमिका खा. गायकवाड यांनी घेतली. त्यावर ‘कायदा आपले काम करतो, सुरक्षेशी कुठलीही तडजोड नाही’ असे मोघम उत्तर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी दिले. त्यामुळे संतप्त झालेले शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते चक्क राजू यांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे लोकसभेत एकच गदारोळ उडाला. खा. गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासबंदी उठवली नाही तर मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही, असा खणखणीत इशाराही यावेळी शिवसेना खासदारांनी या गोंधळादरम्यान दिला. त्यामुळे एअर इंडिया व्यवस्थापनाने मुंबई, पुणेसह सर्व विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. खा. गायवाड यांच्या प्रवासबंदीवर एअर इंडिया ठाम असून, माफी मागितल्याशिवाय प्रवासबंदी हटविणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे खवळलेल्या शिवसेनेने 10 एप्रिलपर्यंत याप्रकरणी तोडगा काढला नाही तर शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या बैठकीत सहभागी होणार नाही, अशी भूमिका पक्षप्रवक्ते खा. संजय राऊत यांनी जाहीर केली आहे. लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी याप्रश्‍नी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत प्रवासबंदी उठविण्याचा निर्णय झाला असल्याचे सूत्राने सांगितले. त्याबाबत एअर इंडिया लवकरच घोषणा करेल, असेही सूत्र म्हणाले.

केंद्रीय मंत्री गीतेंचा सभागृहात राडा
खा. रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासबंदीवरून शिवसेना खासदारांनी गुरुवारी लोकसभेत अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. खा. गायकवाड यांनी लोकसभेत याप्रश्‍नी निवेदन करूनही नागरी उड्डाणमंत्र्यांनी काहीच ठोस भूमिका न घेतल्याने केंद्रीय अनंत गीते अक्षरशः या मंत्र्यांच्या अंगावर धावून गेले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अनंत कुमार, अहलुवालिया, स्मृती इराणी, जयंत सिन्हा या मंत्र्यांनी तातडीने गजपती राजू यांना कडे करत त्यांचा बचाव केला. अहलुवालिया यांनी तातडीने गजपती राजू यांना आपल्या दालनात घेऊन गेले तर राजनाथ सिंह यांनी अनंत गीते यांना शांत केले. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी या प्रकारानंतर राजनाथ सिंह, गजपती राजू आणि शिवसेना खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत खा. गायकवाड यांची प्रवासबंदी हटविण्यावर मतौक्य झाल्याचे सूत्राने सांगितले. दुसरीकडे, शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी सांगितले, की 10 एप्रिलपर्यंत खा. गायकवाड यांच्यावरील प्रवासबंदी हटविली गेली नाही तर शिवसेना एनडीएच्या बैठकीत सहभाग घेणार नाही.

.. तर पंतप्रधानांच्या रात्रभोजनावर बहिष्कार!
केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री गजपती राजू यांनी खा. गायकवाड यांच्या बंदीचे समर्थन केल्याने शिवसेना संतप्त झाली आहे. गायकवाड यांच्या प्रकरणावर 10 एप्रिलपर्यंत निर्णय नाही झाला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी असलेल्या एनडीएच्या रात्रभोजनाला शिवसेना उपस्थित राहणार नाही, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला.

खा. गायकवाड हे बुधवारी खासगी विमानाने दिल्लीत पोहोचले. त्यांनी गुरुवारी लोकसभेत निवेदन देऊन स्वतःची बाजू मांडली. यावेळी गायकवाड प्रकरणात विमान कंपन्यांनी घातलेली प्रवास बंदी आणि पोलिसांनी नोंदवून घेतलेला जीवे मारण्याचा गुन्हा (कलम 308) ही एकतर्फी कारवाई आहे. गायकवाड यांची चौकशी न करता ही कारवाई करण्यात आली आहे, असे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी लोकसभेत सांगितले. एखाद्या लोकप्रतिनिधीवर विमान प्रवासाची बंदी कशी घालू शकता? आम्ही हा मुद्दा लोकसभेत तसेच केंद्रीय गृहमंत्री आणि नागरी विमान वाहतूक मंत्री यांच्या समोर उपस्थित केला आहे. हा प्रश्न लवकरच सोडवला जाईल अशी आशा आहे, असे खा. राऊत यांनी सांगितले.