मुंबईत अग्नितांडव!

0

मुंबई : लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीला गुरुवारी रात्री साडेबारा वाजता भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला, तर 55 जण जखमी झाले. या इमारतीच्या टेरेसवर असलेल्या मोजोस पबमध्ये पार्टी सुरू असताना ही आग लागल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मृतांमध्ये पबमधील तरुण-तरुणींचा अधिक समावेश आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे टेरेसवरील रेस्टॉरेंट्स आणि पबच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली, तसेच दोषी महापालिका अधिकार्‍यांवर कारवाईचे आदेश देत पाच अधिकारी तडकाफडकी निलंबित केलेत. या प्रकरणी पब आणि रेस्टॉरेंटच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्देवी घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त केले आहे.

11 महिलांसह तिघे गुदमरून ठार, 55 जण होरपळले
लोअर परेल येथील दीपक टॉकीजजवळ ट्रेड हाऊस चार मजली इमारत आहे. या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर रात्री 12.30 दरम्यान आग लागली. ही आग पहाटे 4 वाजून 52 मिनिटांनी आटोक्यात आली असली तरी सकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी संपूर्ण आग विझवण्यात मुंबई अग्निशमन दलाला यश आले. आग वरच्या मजल्यावर पसरत गेली. याच इमारतीच्या टेरेसवर रेस्टॉरेंट आणि पबदेखील आहे. त्यात या टेरेसवर प्लॅस्टिक आणि बांबुचे बांधकाम होते. त्यामुळे आग आणखी वाढत गेली. आग इतकी भीषण होती की टेरेसवर बांधण्यात आलेले बांबू आणि प्लास्टिकचे छप्पर जळून खाक झाले. सिलिंडरचे स्फोट झाल्याने आग आणखी पसरल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीत 14 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये 11 महिलांचा तर 3 पुरुषांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 55 जण जखमी झाले. जखमींमध्ये 30 पुरुष आणि 25 महिलांचा समावेश आहे. ऐरोली बर्न रुग्णालयात 1, भाटिया रुग्णालयात 13 असे 14 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 41 जणांवर उपचार करून सोडून देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मृतांमध्ये पबमध्ये आलेल्या तरुण-तरुणींचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. घटनास्थळी मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, सभागृह नेते यशवंत जाधव, पालिका आयुक्त अजोय मेहता, शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह आमदार सुनील शिंदे, नगरसेवक आशीष चेंबूरकर, समाधान सरवणकर, आमदार नीतेश राणे, आमदार प्रसाद लाड, आशीष शेलार इत्यादींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

प्रसारमाध्यमांनाही आगीची झळ
कमला मिल परिसरात अनेक प्रसारमाध्यमांची कार्यालये आहेत. यात टाईम्स नाऊ, टीव्ही 9, झूम टीव्ही आणि रेडिओ मिर्ची यांचा समावेश आहेत. आग इतकी भीषण होती की, प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांमधील फायर अलार्म वाजला. त्यानंतर येथील सर्व कार्यालये रिकामी करण्यात आली. टाईम्स नाऊ, मिरर नाऊच्या कार्यालयामध्ये धूर पसरला होता. या आगीत आजूबाजूच्या अनेक कार्यालयांचं नुकसान झाले. यामुळे टाईम्स चॅनल्सचे ब्रॉडकास्टिंग थांबवण्यात आले होते. कमला मिल कंपाऊंडमधील ’वन-अबव्ह’ पब आणि ’हॉटेल मोजोस ब्रिस्टोल’ला आग लागली होती. या प्रकरणी मालक अभिजीत मानकर, हितेश संघवी आणि जिगर संघवी याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनपाचे पाच अधिकारी निलंबित
या अग्निकांडातील बळींची नावे अशी, प्रीती रोजनी (वय 49), तेजल गांधी (वय 36), प्राची खेतानी (वय 31), प्रमिला केणी (वय 28), किंजल शाह (वय 28), कविता गोर्‍हानी (वय 36), पारुल (वय 45), मनिषा शाह (वय 30ः, याशा ठक्कर (वय 28), शेफाली दोषी (वय 45), खुशबु (वय 28), सरबजीत परेरा (वय 24), विरवा ललानी (वय 23), धैर्या लखानी (वय 26). कमला मिल अग्नितांडवात 14 बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाईला सुरुवात केली होती. पालिकेच्या पदनिर्देशित अधिकारी मधुकर शेलार, ज्युनिअर इंजिनियर धनराज शिंदे, सब इंजिनिअर महाले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी पडगिरे, अग्निशमन अधिकारी एस. एस. शिंदे या पाच अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. कमला मिलच्या परवानग्यांशी संबंधित अधिकार्‍यांवरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच जी साऊथ वॉर्ड ऑफिसर सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

मुंबईमधील कमला मिल कंपाऊंडमध्ये भीषण आग लागून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पीडितांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. या घटनेची त्वरीत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
– खा. राहुल गांधी, अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस

वन अबाव्ह आणि मोजोस ब्रिस्टोल या हॉटेल्समध्ये लागलेल्या आगीप्रकरणी हॉटेल मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, कंम्पाउंडमधील बांधकामे आणि पब्सना परवानग्या देण्याबाबत महापालिका अधिकार्‍यांनी जाणूनबुजून निष्काळजीपणा दाखवला असेल, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत. घटना घडल्यावर सरकार फक्त चौकशीचे आदेश देते, परंतु ठोस कारवाई होत नाही. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नाहीत. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून या घटनेला जबाबदार असणार्‍यांवर कडक कारवाई करावी.
– खा. अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

दुर्घटनाग्रस्त ट्रेड हाऊसमधील ते पब अनधिकृत होते. या पबकडे कोणतीही परवानगी नव्हती. कमला मिल कंपाऊंड आणि फिनिक्स मिल या ठिकाणी हीच समस्या आहे. राज्यातील नगरविकास खात्याला या मिलमधील रेस्तराँचे फायर ऑडीट करण्याचे आदेश द्यावे. या मिल म्हणजे मृत्यूचा सापळाच आहे.
– डॉ. किरीट सोमय्या, भाजप नेते

ही फारच धक्कादायक आणि दुःखद घटना आहे. जखमींच्या आणि मरण पावलेल्यांसाठी मी प्रार्थना करतो. तसेच मी महापालिकेच्या आयुक्तांशीही, आमदार सुनील शिंदे यांच्याशी बोललो आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचेही मी बोललो आहे.
– आदित्य ठाकरे, अध्यक्ष, युवासेना

ठळक बाबी
– आगीचे नेमके कारण कळले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
– आठ अग्निशमन दलाच्या गाड्या, सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविता आले.
– आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचे मोठे नुकसान झाले.
– दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांची चौकशी समिती गठीत.