मुंबईत आजही महिलांना पाण्यासाठी रात्री अपरात्री पहाटे उठावे लागते

0

मुंबई : मुंबई महापालिकेने पाण्याच्या दरात वाढ केली आहे. परंतु पाणीपट्टीत वाढ केली जात असली तरी पुरवठ्यात सुधारणा झालेली नाही. आजही महिलांना पाण्यासाठी रात्री अपरात्री पहाटे उठावे लागते. बर्‍याच ठिकाणी अत्यंत कमी दाबाने फक्त 30 ते 40 मिनीटे पाणीपुरवठा होत आहे. काही ठिकाणी रात्री 2-3 वाजता, पहाटे 4-5 वाजता पाणी येते. त्यामुळे नोकरदार महिलांना पुरेशी झोप मिळत नसल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.पाणी पुरवठ्याच्या वेळांमध्ये बदल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने मुंबई महापालिकेकडे केली आहे.

मुंबईत महिलांच्या आरोग्यावर परिणाम करणार्‍या विविध घटकांना अधोरेखित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर तसेच महापालिका गटनेत्या राखी जाधव यांच्यासह नगरसेविका व पक्षाच्या महिला पदाधिकार्‍यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन पाणी पुरवठा, साथीचे आजार, कचरा व्यवस्थापन, शौचालयांची दुरुस्ती, प्रसुतीगृहांची कमतरता आदी प्रश्नांना वाचा फोडली.

2 महिन्यांत सुधारणा करा
पुढील दोन महिन्यांत जर याबाबत सुधारणा न झाल्यास या मुद्याबाबत तीव्र आंदोलन करू असा इशारा या महिला आघाडीने दिला आहे. मुंबईत आज 90 टक्के महिला कामधंद्यासाठी घराबाहेर पडत आहे. परंतु अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा हा रात्री दोन वाजल्यापासून सुरु होतो. मग महिलांनी पाणी भरायचे कधी आणि झोपायचे कधी असा सवाल चित्रा वाघ आणि सुरेखा पेडणेकर यांनी केला.

रुग्णांची आकडेवारी फसवी
1 साथीच्या आजारांबाबत महापालिकेच्यावतीने दिली जाणारी रुग्णांची संख्या ही फसवी असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला. हा आरोपच नाही तर आपला दावा असल्याचे सांगत वाघ यांनी महापालिकेच्या रुग्णालयात चांगल्याप्रकारे उपचार न मिळत असल्यामुळे तसेच विश्वास नसल्यामुळे अनेक रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये जात आहेत.

2 महापालिका केवळ आपल्याकडीलच आकडेवारी देते. खासगी रुग्णालयातील आकडेवारी कधीच देत नाही. त्यामुळे साथीच्या आजाराबाबत महापालिका जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

3 महापालिका रुग्णालयातील अपघात विभागात येणार्‍या रुग्णांची परिस्थिती फार गंभीर असल्यामुळे त्यांना नॉरऍड्रीनालीन, ऍड्रीनालीन, डोपामीन, डोबीटामीन यापैकी एक औषध ताबडतोड दिले जाते. परंतु ही औषधेही उपलब्ध नसल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला. परिणामी या औषधासाठी येणारा 700 रुपयांचा खर्च रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन औषधे आणून करावा लागतो.

प्रसुतीगृहं बांधली पण सुरू कधी होणार?
आरक्षित जागांवर प्रसुतीगृह तसेच रुग्णालयांच्या इमारती बांधून तयार आहेत. परंतु त्या ताब्यात घेतलेल्या नाहीत. दिंडोशी, मानखुर्द, चेंबूर आदी ठिकाणी प्रसुतीगृहांच्या इमारती ताब्यात न घेतल्यामुळे तेथील पंखे चोरीला गेले आहेत. स्थानिक गुंड त्याठिकाणचा वापर दारु पिण्यासाठी करत आहेत. त्यामुळे भविष्यात याठिकाणी कोणताही दुर्देवी प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल वाघ यांनी केला.

कचरा पाडतोय मुंबईकरांना आजारी
मुंबईतील सगळया आजाराचे कारण कचरा हेच असून दिवसातून एकदाच कचरा उचलला जातो. परंतु, त्यानंतर तो कचरा उचलला जात नाही. एका बाजुला कचराकुंड्यांची संख्या कमी केली आहे. दुसरीकडे सार्वजनिक कचराकुंड्या ओसंडून वाहत आहे. परिणामी या कचर्‍यामुळे रोगराई पसरत असल्याचे सांगत दत्तक वस्ती योजनेत हजेरीपटावर दाखवलेले कामगार हे काम करतच नसल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिकेच्या अधिकार्‍यांना दमदाटी करून ते हजेरी लावून घेत असतात. त्यामुळे कचरा निट उचलला जात नाही. त्यामुळे या यंत्रणेत सुधारणा होणे गरजेच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाणी समस्या कायम
महापालिकेने आठ टक्के पाणीपट्टी वाढवूनही महिलांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. ब-याच ठिकाणी अत्यंत कमी दाबाने फक्त 30 ते 40 मिनीटे पाणीपुरवठा होत आहे. काही ठिकाणी रात्री 2-3 वाजता, पहाटे 4-5 वाजता पाणी येते. त्यामुळे नोकरदार महिलांना पुरेशी झोप मिळत नसल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.