मुंबई : उत्तर प्रदेश दहशवादविरोधी पथकाने रविवारी मुंबईत मोठी कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. इसिस या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी अबु जाहिद सलाउद्दीन शेख हा मुंबईतून पसार होण्याच्या तयारीत असतानाच त्याच्यावर दहशतवाद विरोधी पथकाने झडप टाकून त्यास ताब्यात घेतले. उत्तर प्रदेशातील आझमगड या कुप्रसिद्ध ठिकणचा रहिवाशी असलेल्या जाहिदला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. मुंबई विमानतळावर या दहशतवाद्याला पकडण्यात आले.
सौदीहून भारतात आला
दहशतवादी अबु जाहिद सलाउद्दीन शेख शनिवारी सौदी अरबहून भारतात आला होता. आयबीने या खतरनाक दहशतवाद्याविरूद्ध लुक आऊट नोटीस जारी केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी अबु जाहिद दुबईतून इसिसचे नेटवर्क नियंत्रित करत होता. अबु जाहिद हा बिजनौर आणि पश्चिम उत्तर प्रदेशातून पकडलेल्या संशयित अतिरेक्यांच्या थेट संपर्कात होता. दहशतवादी कृत्य घडविण्यासाठी तो भारतात आला आहे, अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती.
दहशतवादी हल्ल्याची तयारी
एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेश एटीएसने अन्य सुरक्षा यंत्रणा आणि राज्य पोलिसांच्या मदतीने चार दहशतवाद्यांना अटक केली होती. हा दहशतवादी गट इंटरनेटद्वारे एका अॅपवरून आपसात चर्चा करून एक दहशतवादी हल्ला घडविण्याची तयारी करत होता. या चौघांना अटक केल्यानंतर तपासातून इसिसचा दहशतवादी अबु जाहिदचे नाव समोर आले. तेव्हापासून पोलिस अबु जाहिदच्या मागावर होते.
तपास यंत्रणांकडे ठोस पुरावे
पश्चिम मोहल्ला छाऊ, थाना, गंभीरपुर, आझमगड येथील अबु जाहिद रहिवाशी आहे. सध्या तो सौदी अरब येथे राहात होता. तो सौदी अरबमधून भारतातील त्याच्या सहाकार्यांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी मदत करत होता. यापूर्वी अटक केलेल्या दहशवाद्यांच्या मोबाईल फोनमधून यासंदर्भातील ठोस पुरावेही सुरक्षा यंत्रणांना मिळाले आहेत. त्याच्याविरूद्ध लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. अबु जाहिद हा उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही तरूणांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशिल होता.
अबु जाहिदला लखनऊला नेणार
वरिष्ठ सुरक्षा अधिकारी आनंद कुमार यांनी सांगितले की, पकडण्यात आलेला इसिसचा दहशतवादी अबु जाहिद याचा ट्रांजिस्ट रिमांड घेऊन त्यास लखनऊ येथे नेण्यात येईल. त्याला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली असून लखनऊ न्यायालयात हजर करून कस्टडी घेण्यात येईल व त्यानंतर त्याची चौकशी करण्यात येईल, असे कुमार यांनी सांगितले.