मुंबईत उद्या पावसाचे जोरदार पुनरागमन?

0

मुंबई । वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई आणि कोकणात जूनच्या पहिल्या आठवड्यात वरूण राजाने हजेरी लावली होती. त्यामुळे वातावरणातील उकाडा काहीसा कमी झाला होता. मात्र, जूनच्या दुसर्‍या आठवड्यात पावसाने दडी मारल्याने पुन्हा एकदा घामाच्या धारा वाहू लागल्या. अशात मुंबईकरांसाठी ही बातमी निश्‍चितच दिलासा देणारी आहे. मुंबईसह कोकण पट्ट्यात येत्या 17 आणि 18 जूनला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आठवडाभर मुंबईत पाऊस पडलेला नाही. त्यामुळे उकाडा चांगलाच वाढला आहे. 9 जून रोजी मुंबईत चांगला पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर गेले सहा दिवस कोरडेच होते. मात्र 17 जूनला म्हणजेच येत्या रविवारी मुंबईसह कोकण भागात मुसळधार पाऊस पडेल, असे वेधशाळेने म्हटले आहे.कुलाबा आणि सांताक्रुझ येथेही चांगला पाऊस होईल असे म्हटले आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुरुवारी मुंबईत 33.5 ते 34 डिग्री तापमानाची नोंद झाली होती, तर आता वातावरणातली आर्द्रताही वाढल्याची नोंद दोन्ही वेधशाळांनी केली आहे.