मुंबईत उभारणार मराठी भाषा विद्यापीठ

0

मुख्यमंत्र्यांच्याहस्ते विधानभवनात औपचारिक कार्यक्रम

मुंबई : मुंबई महापालिकेच्या जागेत आणि ग्रंथालीच्या पुढाकाराने राज्यातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ वांद्रे येथे सुरू होणार आहे. मराठी भाषा दिनानिमित्त मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठासाठी आवश्यक जागेच्या हस्तांतरणाचा औपचारिक कार्यक्रम विधानभवनात होणार आहे.

आशीष शेलार याचा पाठपुरावा
हे विद्यापीठ वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात सुरू व्हावे यासाठी आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी पाठपुरावा केला होता. वांद्रे येथील बँडस्टँड येथील जागा महापालिकेने विद्यापीठासाठी देण्यास तयारी दाखवली. त्यासंबंधीचे अधिकृत पत्र मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ग्रंथालीला देण्यात येणार आहे. ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल यांच्यासह पदाधिकारी, आशीष शेलार आदी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले.

मुंबई महापालिका जागा देणार
राज्यात मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे, यासंदर्भातील मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी विद्यापीठ स्थापन करावे अशी मागणी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अनेकदा करण्यात आली होती. परंतु, साठवर्षांत त्यास मुहूर्त सापडत नव्हता. ग्रंथालीने अभिमत विद्यापीठ स्थापन करण्याचा मानस शेलार यांच्याकडे व्यक्त करून त्यासाठी जागा उपलबध करून देण्याची विनंती केली होती. या विद्यापीठाची वांद्रे येथे उभारणी व्हावी म्हणून शेलार यांनी पुढाकार घेतला आणि महापालिकेकडे जागेची मागणी केली.

राज्यातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ
मुंबई महापालिकाही जागा देण्यास तयार झाली आहे. त्या जागेचा हस्तांतरणाचा कार्यक्रम विधानभवनात होणार आहे. हे राज्यातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ असणार आहे. त्यामुळे त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना असावी; तसेच त्यामधील उपक्रम कोणते व कसे असावेत, याबाबतचे अभ्यासपूर्ण नियोजन सध्या सुरू आहे. प्रत्यक्ष जागा ताब्यात आल्यानंतर पुढील कामांना सुरुवात करण्यात येईल, असे ग्रंथालीकडून सांगिण्यात आले.