मुंबई । मुंबई-पुणे मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल पडले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या अमेरिकेतील चाचणी केंद्राला भेट देऊन संबंधितांशी चर्चा केली. तसेच मुंबईत अत्याधुनिक डाटा सेंटर्स उभारण्यासह नागरिकांना सेवा अधिक गतीने देता याव्यात यासाठीही ओरॅकल ही कंपनी राज्य शासनासोबत काम करणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौर्यावर आहे. दौर्याच्या अखेरच्या टप्प्यात या पथकाने नेवाडा येथे व्हर्जिन हायपरलूप तंत्रज्ञानाच्या चाचणी केंद्रास भेट दिली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक रॉब लॉईड यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातील संपूर्ण माहिती दिली. मुंबई-पुणे या मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.
सरकार ‘ओरॅकल’सोबत काम करणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया अभियानाला पाठबळ देण्यासाठी ओरॅकलने एक अभियान हाती घेतले आहे. त्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘ओरॅकल’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कात्झ यांचीदेखील सॅन फ्रॅन्सिस्को येथे भेट घेतली. मुंबईमध्ये अत्याधुनिक डाटा सेंटर्स सुरु करण्याची ‘ओरॅकल’ची तयारी आहे. त्यासाठी आवश्यक गुंतवणूक प्रस्तावांवरील कार्यवाहीस राज्य शासनाने गती द्यावी, अशी विनंती त्यांनी केल्यानंतर या संदर्भातील कार्यवाहीसाठी ‘ओरॅकल’ला आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकारतर्फे दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. जनसामान्यांना अधिक चांगल्याप्रकारे सेवा प्रदान करण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर शासकीय माहितीच्या संदर्भात करता यावा, या हेतूने एक संयुक्त गट स्थापन करण्याबाबतसुद्धा यावेळी सहमती झाली. सोबतच आर्टिफिशियल इंटिलिजन्स, फिनटेक, क्लाऊड कम्प्युटिंग इत्यादींसंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. नागरिकांना आपल्या कामांसाठी अनेक प्रकारची माहिती घेऊन विविध शासकीय विभागांकडे जावे लागते. यापासून त्यांना दिलासा देण्यासाठी एक विशिष्ट प्रणाली विकसित करण्यासंदर्भातदेखील राज्य सरकार ‘ओरॅकल’सोबत काम करणार आहे.