मुंबई । दरवर्षी मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र प्रत्येक वर्षी जसे बेकायदा मंडळे गणेशोत्सव साजरा करत असतात तसेच परवानगी दिलेल्या जागेपेक्षा अधिक मोठा मंडप बांधून रस्त्यावर खड्डे खोदले जातात, उत्सव संपल्यानंतर ते बुजवलेही जात नाहीत, असाही प्रकार दरवर्षी होत असतो. अशाच प्रकारे यंदाच्या वर्षी खड्डे न बुजवणार्या मुंबईतील 13 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेने 12 लाख 94 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ’एफ दक्षिण’ विभागातील हे सर्व मंडळे असून यात लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाला 246 खड्ड्यांसाठी 4 लाख 86 हजार रुपये, तर लालबागमधीलच ’गणेशगल्ली मुंबईचा राजा’ मंडळाला 207 खड्ड्यांकरता 4 लाख 14 हजार रुपये दंड आकारला असून, याबाबतच्या नोटीस मंडळांना पाठवली.
लाखो गणेशभक्तांच्या लाडक्या ’लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मुंबई महापालिकेने या वर्षी रस्त्यांत खड्डे पाडल्याप्रकरणी 4 लाख 86 हजार रुपयांचा दंड आकारला आहे. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी मात्र मंडळाने रस्त्यात खड्डे पाडले नसल्याचा आणि पालिकेची नोटीसही मिळाली नसल्याचा दावा केला आहे. या मंडळाने यंदा तब्बल 200 खड्डे पाडले आहेत. ’लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ या वर्षीदेखील रस्त्यांमध्ये खड्डे पाडल्याप्रकरणी पुन्हा चर्चेत आले आहे. गणरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी अलोट गर्दी लोटत असल्यामुळे त्यांच्या सुविधेकरिता मंडप रस्त्यात उभारला जातो. त्यासाठी पालिकेकडून परवानगी मात्र घेतली जात नाही, असा आरोप पालिकेचे अधिकारी करतात.
मंडळांकडून मात्र इन्कार
पोलिसांनी आखून दिलेल्या नियमानुसार, स्टीलच्या प्लेटवर लोखंडी खांब उभारण्यात आले होते. यामुळे मंडळाने खड्डे खोदले असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगून पालिकेचा हा दावा चुकीचा आहे. मंडळाने खड्डे खोदले नसूनही गणेशोत्सव झाल्यानंतर स्वच्छता मोहीमदेखील राबवली होती, असे ते म्हणाले. महापालिकेकडून अद्याप मंडळाला नोटीस आलेली नसून, नोटीस आल्यानंतर मंडळ त्याची शहानिशा करून काही दंड असल्यास भरेल. गेल्या वर्षी पालिकेने मंडळाला साडेचार लाखांहून अधिक रकमेची दंड आकारणी केली होती.