मुंबई-मुंबईत अद्याप मान्सून दाखल झाला नसला तरी मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. शनिवारी पहिल्याच पावसाने प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल केल्यानंतर आज पुन्हा एकदा पवई, हिंदमाता, लोअर परेल या सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
मुंबईची लाईफलाईन असलेली उपनगरीय लोकलसेवा विस्कळीत झाली असून लोकल काही मिनिट उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वे १५ मिनिट उशिराने धावत आहे. घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलूंड, अंधेरी, बोरिवली, मालाड परिसरात पावसाने जोर पकडला आहे. आज सकाळपासून शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण होते. दक्षिण मुंबईत ११ वाजेनंतर पावसाचा जोर वाढला.
पावसाळ्यात काय होणार?
दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळा सुरु व्हायच्या आधी प्रशासनाने नालेसफाई आणि पाणी साचणार नाही असे दावे केले होते. पण मान्सूनपूर्व पावसाने प्रशासनाची तयारी उघडी पाडली आहे. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. जून महिन्यात ही स्थिती असेल तर जुलै, ऑगस्टमध्ये काय होईल ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मुंबई सध्या मेट्रो प्रकल्प आणि अन्य कामांसाठी मोठया प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचण्याची भिती आहे.
कोकणाच्या सीमेपर्यंत पोहोचलेल्या मान्सूनने अद्याप मुंबईत प्रवेश केलेला नाही. ११ जूनपर्यंत कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.