मुंबईत भाजपापेक्षा शिवसेनेचे पारडे जड

0

मुंबई । मुंबई महापालिकेचे महापौरपद कोणाकडे जाणार यावर चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत रंगत आहे. कोणत्या पक्षाचा महापौर होणार यासंदर्भात तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी आकड्यांचे गणित महत्वाचे ठरणार आहे. महापालिकेची मुदत 8 मार्चला संपत असल्याने 9 मार्चला नव्या महापौरांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. मुंबई मनपा निवडणुकीत शिवसेनेला 84, भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेसला 9, मनसेला 7, समाजवादी पक्षाला 6, आणि अपक्षांना 6 जागा मिळाल्या आहेत. कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने चुरस वाढली आहे. भाजपा -सेना दोन्ही पक्ष महापौरपदासाठी दावे करीत आहेत . आकड्यांच्या जोडतोडमध्ये भाजपापेक्षा शिवसेनेचे पारडे जड आहे. दोन्ही पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. या खेळात सेनेच्या गटाचा आकडा 90 पर्यंत गेला आहे. मात्र भाजपाचा आकडा 82 वर स्थिरावला आहे. आकड्याच्या जुळवाजुळवीमध्ये सेनेने आघाडी घेतली आहे. युती तुटल्यानतर भाजपा व सेना महापौर पदासाठी दावेदारी करीत आहे. सेना महापौर पदासाठी सावधपणे पाऊले टाकतांना आकडेवारीवरुन दिसुन येत आहे.

आकड्याच्या गणितात सेना पुढे
महापौरपदावर पुन्हा सेनेचा उमेदवार विराजमान व्हावा यासाठी शिवसेनेने गट स्थापन केला आहे. शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले आहेत. गट स्थापनेनंतर सेनेचा आकडा 90 पर्यंत गेला आहे. या गटात सेनेत बंडखोरी केलेले व अपक्ष विजयी झालेल्या उमेदवारांचा समावेश आहे. 5 अपक्ष आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांनीही पाठिंबा दिल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. दुसरीकडे भाजपचे 82 नगरसेवक असल्यामुळे शिवसेनेची खरी स्पर्धा भाजपशी आहे. एका अपक्षाने साथ दिल्याचा दावा भाजपने केला आहे.

सेनेसाठी कॉग्रेस सभात्याग करणार?
महापौर निवडीच्या दिवशी सर्व 227 नगरसेवक उपस्थित राहिले आणि भाजपा व शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार दिल्यास काँग्रेस (31), राष्ट्रवादी (9), मनसे (7) आणि इतर (2) यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असेल.शिवसेनेला हक्काची 90 मते मिळतील. भाजपला 82 मते मिळतील असा अंदाज धरल्यास राहिलेली काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि इतरांची मते निर्णायक ठरतील. ही मते ज्यांना मिळतील, त्यांचा महापौर होईल. त्यासाठी 114 आकडा गाठण्याची गरज नाही. दुसरा अंदाज असा आहे की, कॉग्रेसने सभात्याग केल्यास शिवसेनेला फायदा होऊ शकतो. सभागृहात 196 नगरसेवक राहतील. त्यामुळे बहुमताचा आकडा 99 वर असेल त्यामुळे हा आकडा गाठण्याचे बंधन राहणार नाही, सर्वाधिक मते आवश्यक असतील. त्यावेळेस शिवसेना व मनसे एकत्र आल्यास 97 वर ते जातील. भाजपा – राष्ट्रवादी एकत्र आल्यास 90 संख्या होईल त्यामुळे भाजप महापौरपदावर दावा करू शकते. सेना – कॉग्रेस एकत्र आल्यास 121 असे स्पष्ट बहुमत होवू शकते. या सर्व शक्यता गृहीत नाही धरल्या आणि सभागृहात फक्त सेना,भाजपशिवाय कोणीच उपस्थित न राहिल्यास महापौरदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने त्यांचा महापौर होईल. यात काहीच शंका नाही सेनेने नुकताच आपल्या नगरसेवकांचा गट स्थापन केला आहे.

जादुई आकडा
राज्यातील कोणत्याही निवडणुकीच्या निकालापेक्षाही मुंबई महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा महापौर बसणार याकडे लक्ष लागले आहे. महापौरपदावर विराजमान होण्यासाठी 114 हा जादूई आकडा आवश्यक आहे. 227 नगरसेवकांची संख्या असलेल्या या महापालिकेत 114 हा बहुमताचा आकडा पार करेल, त्या पक्षाचा महापौर होतो. मात्र कोणालाच हा आकडा गाठता न आल्याने, काहीसा संभ्रम आहे. मात्र महापौरपदासाठी 114 हा आकडा गाठण्याची गरज नाही, महापौर निवडणुकीवेळी सभागृहात उपस्थित सभासद संख्येपैकी सर्वाधिक मते ज्याला मिळतील, तो महापौर होईल.