नवी मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर ठेपली असतांना भाजपाच्या ४ नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नवी मुंबईतील तुर्भे येथील हे नाग्र्सेअक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत. माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, त्यांची पत्नी नगरसेविका राधा कुलकर्णी, संगीता वास्के आणि मुद्रिका गवळी यांसह असंख्य कार्यकर्ते मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील भाजपच्या या चार नगरसेवकांनी राजीनामा दिला होता. या चारही नगरसेकांनी आपले राजीनामे महापालिका आयुक्त अण्णा मिसाळ यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्याशिवाय राजीनामा देण्यापूर्वी या नगरसेवकांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. सुरेश कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या भव्य हळदीकुंकू समारंभासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सुरेश कुलकर्णी यांचे कौतुक केले होते.
भाजप नेते गणेश नाईक यांचे अस्तित्व खिळखिळे करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीअगोदर भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत सर्व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र, त्यातील काही नगरसेवक पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत. त्यामुळे चार नगरसेवक राजीनामा दिल्यानंतर नाईक गटाला ऐन निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता आहे.