मुंबई : 2012 मधील मुंबई महापालिका निवडणुकांच्या तुलनेत 2017 मधील निवडणुकीतल्या मतदानामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत तब्बल 6 लाख अधिक मतदारांनी मतदान केल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला असला, तरी अनेकांना मतदारयादीतील घोळामुळे मतदान करता आले नाही. मुंबईत 2012 मध्ये भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या यादीमध्ये 1 कोटी 2 लाख मतदार होते.
योग्य कारणाने नावे वगळली
5 जानेवारी 2017 ला तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये 91 लाख 80 हजार मतदारांची यादी तयार करण्यात आली होती. म्हणजेच जवळजवळ 11 लाख मतदार हे यंदाच्या मतदारयादीतून गायब होते. मात्र, मतदारयादी सातत्याने नियमित करण्यात येते. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदारयादी नियमित करण्यात आली. यात नव्या मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली, तर मृत, मुंबईबाहेर स्थलांतरित, दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात आली, असे सहारिया म्हणाले.
केंद्र सरकारच्याच अंतिम याद्या वापरल्या
केंद्रीय निवडणूक आयोगाने जी अंतिम यादी जाहीर केली त्या यादीनुसारच यादीतील सर्वांना मतदानाचा हक्क होता, असे म्हणत राज्य निवडणूक आयोगाने याची जबाबदारी केंद्रावर ढकलली. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदारयाद्या विधानसभा मतदारसंघानुसार तयार केल्या. याच मतदारयाद्या या महापालिका निवडणुकीत प्रभागानुसार फोडण्यात आल्या. त्यामुळे वॉर्ड बदलला असेल पण यादीत नाव निश्चितपणे असेल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.