मुंबईत मराठा क्रांती मोर्च्याची जय्यत तयारी

0

मुंबई। मुंबईत मराठा समाजाचा लक्षवेधी मोर्चा 9 ऑगस्टला असून यासाठी 6000 स्वयंसेवक मोर्चासाठी सज्ज झाले आहेत. सकाळी 11 वाजता भायखळा येथील वीरमाता जिजामाता उद्यान येथे जिजाऊ वंदना करून मोर्चाची सुरुवात करण्यात येणार. त्यानंतर कै अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्मैल मर्चंट चौक, जे जे फ्लायओव्हर ते सीएसटी ओलांडून आझाद मैदान येथे येणार असल्याचे वीरेंद्र पवार यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

विविध स्तरातून सहकार्य
सामाजिक संस्था, गणेशोत्सव व दहीहंडी मांडले, मुंबई डबेवाले, रेल मराठा स्वयंसेवक, मराठा मेडिको असोसिएशन आणि अनेक सामाजिक राजकीय व्यक्ती सहकार्य मुंबईतील मराठा मोर्चाला मिळणार आहे. मोर्चाच्या वेळी काही सूचना असतील तर 9350411011 या क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. मुंबईतील हा मोर्चा हा शेवटचा मोर्चा असून यापुढे मराठा समाज सरकारकडे जाणार नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. मात्र या मोर्च्याची जबाबदारी शासनाची असणार आहे.

नागरिकांची सुविधा
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या मराठा समाजासाठी कामोठे खांदेश्वर, जुईनगर, वाशी, नवी मुंबई येथे तसेच ठाणे, मुलुंड, भांडूप, चेंबूर येथे पाण्याची व फिरते शौचालयाची सोय करण्यात आली आहे. बीपीटी सिमेंट यार्द रे रोड येथे वाहन पार्किंगची सोय करण्यात आली आहे. सूचना फलक जागोजागी लावण्यात आले आहेत.