मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मास्कचा तुटवडा भासत आहे. मात्र याही परिस्थितीत काही जणांकडून अशा मास्कचा काळाबाजार सुरु आहे. मुंबईतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्यासाठी आलेल्या मास्कचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबईच्या जुहू परिसरात मास्कचा साठेबाजार करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत जवळपास १५- २० कोटींचे २५ लाख मास्क जप्त करण्यात आले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन परिस्थिचीचा आढावा घेतला.
कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेतला तर मास्कची सर्वाधिक गरज डॉक्टर्स आणि आरोग्य यंत्रणेशी संबधित कर्मचाऱ्यांना आहे. मात्र असं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात मास्कचा साठेबाजार कुणी केला आणि अजून मास्कचा साठा केलाय का याची माहिती आता पोलीस घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी पोलिसांना मास्कच्या साठेबाजाराबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर मुंबईचे आयुक्त परमबीर सिंह यांनी स्वत: लक्ष घालून ही मोठी कारवाई केली आहे.