मुंबईत मुसळधार, जनजीवन ठप्प

0

मुंबई। 2005 च्या अतिवृष्टीनंतर तब्बल एक तप उलटल्यानंतर मुंबईकरांनी मंगळवारी पुन्हा एका अतिवृष्टीचा अनुभव आला, 24 तासांत 152 मिमि पावसाची नोंद सकाळी 8 वाजेपर्यंत झाली होती, तेव्हाच अर्ध्याहून अधिक मुंबई पाण्याखाली गेली असतांना दुपारी समुद्राला भरती आणि आकाशात पाण्याचे गच्च ढग अशा निसर्गाच्या कात्रीत मुंबापुरी सापडली होती, दिवसअखेर पावसाचा जोर आणखी वाढला आणि अवघी मुंबापुरी ठप्प झाली. सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली होती, पहाटेपासून पावसाने जोर धरला होता. एका तासात 52 मि.मि पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे सकाळपासूनच मुंबईत अनेक भागांमध्ये पाणी साचले. त्याचा परिणाम उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर झाला. मुंबईतील लोकल ट्रेन म्हणजे लाईफलाईनच. मुसळधार पावसाने मुंबईतील तिन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. मध्य रेल्वेवर परळ- कुर्लादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. तर पश्चिम रेल्वेवर एल्फिन्स्टन ते दादरदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही बंद झाली. तर हार्बर रेल्वेवरील वाहतूकही बंद पडली. तिन्ही मार्ग बंद झाल्याने कामावरुन घरी परतणार्‍या मुंबईकरांचे हाल जाले. सर्वच उपनगरीय रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी वाढली. पहिल्याप्रथम मध्य रेल्वे ठप्प झाली, त्यानंतर हार्बर लाइन आणि नंतर पश्‍चिम रेल्वे ठप्प झाली.

रस्त्यांचे नद्यांमध्ये रुपांतर
26 जुलै 2005 नंतरचा सर्वाधिक पाऊस असल्याचा अंदाज हवामानखात्यातील अधिकार्‍यांनी वर्तवला. शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा महापालिकेतर्फे केला जातो. मात्र मुंबई महापालिका यंदादेखील तोंडघशी पडली. दादर, माटुंगा, खार, वांद्रे, अंधेरी,पूर्व द्रुतगती मार्ग, सांताक्रूझ येथे वाहतूक अतिशय संथगतीने सुरु राहिली. दादर टीटी, चर्चगेट जंक्शनची वाहतूक मंदावली. रस्त्यांचे अक्षरश: नद्यांमध्ये रुपांतर झाले.

शाळा-महाविद्यालयांनाही सुटी

मुसळधार पावसामुळे घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादरमध्ये वाहतूक ठप्प झाली. शहरातील दुपारच्या सत्रातील शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या. बुधवारी देखील सुट्टी जाहीर केली आहे. घडाळ्याच्या काट्यावर धावणार्‍या मुंबईला पावसाच्या पावसाने अक्षरशः जखडून ठेवले.

एनडीआरएफची पथके सक्रिय
मुंबईत झालेला मुसळधार पाऊस लक्षात घेता एनडीआरएफचे तीन पथक तातडीने मुंबईत सक्रिय झाले. याशिवाय पुण्याहून एनडीआरएफची दोन पथके मुंबईत आले. दक्षिण मुंबईत यंदाच्या वर्षातील सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला, मात्र कुठेही ढगफुटी झाली नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

हवाई वाहतुक विस्कळीत

रेल्वे आणि रस्ते वाहतुकीपाठोपाठ हवाई वाहतुकीवरही पावसाचा परिणाम दिसून आला. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टेक ऑफ आणि लँडिग किमान 12 ते 15 मिनिटे उशिराने सुरु झाली. परळ येथील केईएम रुग्णालयातही पावसाचे पाणी साचले. रुग्णालयाच्या बाहेर 4 फुटापर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनासहीत रुग्णांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागला. रुग्णालयाच्या तळमजल्यावर पाणी साचल्याने जवळपास 30 रुग्णांना वरील मजल्यावर हलवण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे डीन डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.