मुंबई: मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. जोरदार पावसाचा फटका मुंबईतील लोकल वाहतुकीला बसायला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईतील तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेचे वाहतूक १० मिनिटे उशिराने धावत असून मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक २० मिनिटे उशिराने, तर हार्बर मार्गावरील वाहतूक सुमारे १० ते १५ मिनिटे उशिराने होत आहे.
आज सकाळपासून मुंबई, उपनगरे, ठाणे, पालघर आणि कोकणातील इतर भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली. ठाणे रेल्वे स्थानकातही पाणी साचायला सुरुवात झाल्याचे वृत्त आहे. या मुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झाल्याने लोकल उशिराने धावत आहेत. नवी मुंबईत अनेत ठिकाणी मुसळधार पावसानंतर पाणी साचले आहे. नाल्यांमधील गाळ न काढल्यामुळे रस्त्यांवर दोन-दोन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. या मुळे स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत.