मुंबई । बॉलिवूडमध्ये अभिनय करण्याची स्वप्न बघत अनेक तरुण-तरुणी मायानगरी असलेल्या मुंबईत येतात. मात्र, मुंबईत आल्यानंतर त्यांसोबत कधी-कधी अनपेक्षित अशा घटना घडतात. छोट्या शहरांतून मुंबईत आलेल्या मॉडेल्सला काम मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांना वेश्याव्यवसायासाठी विकणार्या एका महिलेला मुंबई पोलिसांनी भायंदर येथून अटक केली आहे. ही महिला बॉलिवूडमधील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट असून दोन तरुण मुलींचा व्यवहार करत असताना पोलिसांनी तिला रंगेहात पकडले आहे.
पीडित तरुणी या दोघींही बॉलिवूडमध्या काम मिळविण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. एका पार्टीत त्या दोघींची या महिलेशी ओळख झाली होती. त्यानंतर तिने त्यांना बॉलिवूडमध्ये काम मिळण्यासाठी सर्वप्रथम फोटोशूट करण्याची गरज असल्याचे सांगून उत्तन येथे फोटोशूट करण्यासाठी आणले. तेथे ती त्या दोघींना एका दलालाकडे सोपवणार होती. त्या दलालाकडून तिने दोघींचे दोन लाख रुपये घेतले. मात्र, पोलिसांना या प्रकाराची माहिती आधीच मिळाल्याने पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून त्या दोन्ही तरुणींची सुटका केली. पोलिसांनी त्या दलालालादेखील ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस त्या मेकअप आर्टिस्टची चौकशी करत असून तिने याआधी किती तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलले आहे याचा तपास सुरू आहे तसेच ती सेक्स रॅकेट चालवते का, याचा देखील पोलीस तपास करत आहेत.