मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी

शासकीय समित्यांबाबत विश्वासात घेतले जात नसल्याच्या तक्रारी

जळगाव – जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शासकीय समित्यांवर कार्यकर्त्यांची वर्णी लावतांना शिवसेनेने पक्षाचे नेते आणि पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले नसल्याच्या तक्रारी राष्ट्रवादीच्या जिल्हा पदाधिकार्‍यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे संपर्क मंत्री ना. अजित पवार यांच्याकडे आज मांडल्या. दरम्यान यासंदर्भात दि. १५ ऑगस्टपर्यंत तालुकानिहाय याद्या तयार करून त्या पाठविण्याच्या सुचना ना. पवार यांनी जिल्हाध्यक्षांना केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई प्रदेश कार्यालयांमध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक जिल्ह्याचे संपर्क मंत्री ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. जिल्ह्याचे निरीक्षक अविनाश आदिक यांनी जिल्हा दौरा केल्यानंतर त्याचा अहवाल ना. अजित पवार यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार संघटनात्मक बांधणीसाठी आज मुंबईत ना. पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
शासकीय समित्यांवरून तक्रारी
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर किमान समान कार्यक्रमानुसार सहभागी पक्षांनाही न्याय दिला जावा असे निश्चित झाले आहे. असे असतांना जळगाव जिल्ह्यात शासकीय समित्यांवर कार्यकर्त्यांची नेमणूक करतांना शिवसेनेच्या नेतृत्वाने विश्वासात घेतले नसल्याच्या तक्रारी पदाधिकार्‍यांनी ना. अजित पवार यांच्याकडे मांडल्या. त्यावर ना. पवार यांनी याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी आपण स्वत: चर्चा करून मार्ग काढू असे आश्वासन दिले.
जिल्ह्यातील नेत्यांना एकत्र बसवा – संजय पवार
मुंबईत झालेल्या बैठकीत जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी जिल्ह्यातील पक्ष संघटनेविषयी मत मांडले. त्यात काही तालुक्यांमध्ये नेत्यांमध्येच दुरावा असल्याचे सांगितले. हा दुरावा दुर करण्यासाठी आणि पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांना एकत्र बसवून चर्चा घडवून आणण्याची विनंती केली. याबाबत ना. अजित पवार यांनीही जिल्ह्यातील नेत्यांच्या एकजुटीसाठी चर्चा घडवुन आणली जाईल असे सांगितले.
काम न करणार्‍यांना बाजूला करा – ना. पवार
राज्यात सत्ता स्थापनेनंतर पक्षाला मरगळ आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तालुका, ग्रामपातळीवर जे पदाधिकारी काम करीत नसतील त्यांना सन्मानाने बाजूला करून नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या सुचना ना. पवार यांनी केल्याचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी सांगितले. तसेच दि. १५ ऑगस्टपर्यंत वरीष्ठ पातळीवरून केलेल्या सुचनांची अंमलबजावणी झाल्यानंतर ना. अजित पवार हे स्वत: जिल्हा दौरा करून पक्षाच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत माजी मंत्री गुलाबराव देवकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, आमदार अनिल पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहीणी खडसे यांनी देखिल आपापल्या तालुक्याचा आढावा सादर केला.
यांची होती उपस्थिती
बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, माजी आमदार मनीष जैन, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, कार्याध्यक्ष विलास पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे, महीला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, ओबीसी सेलचे उमेश नेमाडे, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहन सोनावणे, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, निरीक्षक अविनाश आदिक, नामदेव चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अक्षय वंजारी, रोहन सोनवणे, एजाज गफ्फार मलिक, अरविंद मानकरी, योगेश देसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.