मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंकवर 2059 पर्यंत टोलधाड?

0

मुंबई। टोलनाके अजूनही चारचाकी वाहनातून प्रवास करणार्‍यांची पाठ सोडायला तयार नाहीत. दिवसेंदिवस टोलची रक्कम आणि मुदत वाढतच आहे. वांद्रे-वरळी सी लिंकवरची टोलवसुली आणखी 20 वर्षांनी वाढवण्याचा विचार एमएसआरडीसी करत आहे. सी लिंकच्या खर्चाची वसुली आणि प्रस्तावित प्रकल्पांचा तुटवडा भरून काढण्यासाठी 2059 पर्यंत टोल आकारला जाण्याची चिन्हे आहेत. 2039 साली सी लिंकच्या टोलवसुलीचा करार संपणार आहे. मात्र अशाच पद्धतीने टोलवसुली सुरू राहिल्यास एमएसआरडीसीच्या इतर प्रकल्पांसाठी पैशाचा तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे ही वसुली आणखी 20 वर्षे पुढे ढकलण्याचा विचार एमएसआरडीसी करत आहे.

वांद्रे-वरळी सी लिंक उभारण्यासाठी 1 हजार 634 कोटींची खर्च आला होता. मात्र 2009 पासून आतापर्यंत फक्त 575 कोटी रुपयांचीच वसुली झाली आहे. टोलवसुलीचा नियोजित कालावधी 30 वर्षांचा (2039 पर्यंत) आहे, मात्र तो वाढवून 50 वर्षांसाठी (2059 पर्यंत) करण्याच्या हालचाली आहेत. त्यातच एमएसआरडीसीतर्फेच वांद्रे-वर्सोवा सी लिंक उभारला जाणार आहे. त्यासाठी तब्बल 7 हजार 500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या खर्च भागवण्यासाठी ही मुदतवाढ करण्याचा विचार महामंडळ करत आहे.

यासंबंधी एमएसआरडीसी राज्य सरकारची परवानगी घेणार आहे. वांद्रे-वर्सोवा सी लिंक उभारण्यासाठी 7 हजार 500 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर अन्य प्रकल्पांसाठीही लागणारा निधी उभारण्याकरता वांद्रे-वरळी सी लिंकच्या टोल वसूलीची मर्यादा वाढवण्याचा पर्याय उत्तम ठरू शकतो, असे एमएसआरडीसीचे म्हणणे आहे.

सध्या सी लिंकवरून प्रती दिन 35 हजार वाहने ये-जा करतात. त्यावेळी चारचाकी वाहनाला 60 रु. तर परतीसाठी 90 रुपये टोल आकारला जातो. 2009 सालापासून या सी लिंकवरून एमएसआरडीसीने 575 कोटी रुपयांचा टोल वसूल केला आहे. आधीच्या नियोजनाप्रमाणे 2039 सालापर्यंत या पुलावरून टोल वसूल केल्यावर एमएसआरडीसीकडे 2 हजार 800 कोटी रुपये जमणार आहेत.