मुंबई । मागील दोन दिवस मुंबईकर गरमीने हैराण झाले आहेत. वातावरणात उष्णता वाढल्याने मुंबईकरांचा अक्षरशः घामटा निघाला, ऑक्टोबर महिना अजूनही आला नसतांना मुंबईकर 35 डिग्री तापमान अनुभवत आहेत. अशा वातावरणात मंगळवारी मध्यरात्री अचानक मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबईत या अनेक भागांत मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास अचानक विजांचा लखलखाट, सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटाने पावसाने वर्दी दिली. पावसाच्या अचानकपणे झालेल्या या आक्रमणामुळे मुंबईकरांची अक्षरशः झोप उडाली. दरम्यान हा गडगडाटासह झालेल्या पावसाची लक्षणे परतीच्या पावसासारखी होती. मात्र परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही. अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला केरळ किनारपट्टीलगत वार्यांची द्रोणीय चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने हा पाऊस पडल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राला या पावसाची झळ बसेल असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिला होता. गेले 2 दिवस मुंबईतल्या हवेची आर्द्रता 85 ते 90 टक्क्यांच्या आसपास पोहोचली होती. त्यामुळे मुंबईकरांची अक्षरश: काहिली झाली होती. पहाटेच्या पावसाने मात्र या गरम वातावरणावर थोडीशी फुंकर घातली आहे.
राज्यात इतरही भागांत पाऊस
मागील 24 तासाच कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बर्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. तसेच पुढील 24 तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यातील कोकण गोव्यासह काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल असेही पुणे वेधशाळेने म्हटले आहे. या पावसाचा उपयोग शेतीसाठी होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे. सततच्या उकाड्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे मंगळवारच्या मध्यरात्रीच्या पावसामुळे बुधवारी सकाळनंतर वातावरणात अधिक उष्णता वाढली. मंगळवारी दिवसभरात नोंदवण्यात आलेले 35.9 डिग्री तापमान हे मागील दशकभराच्या तुलनेत तिसर्यांना सर्वाधिक प्रमाणात नोंदवण्यात आले. त्यामुळे मुंबईकरांची अक्षरः तारांबळ उडाली तसेच, तापमान वाढीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
4 तासांत 103 मि. मी. पाऊस
मध्यरात्री अवघ्या 4 तासांत पावसाने धुवाधार बॅटिंग केली. गाढ झोपेत असलेल्या मुंबईकरांना खाडकन झोपेतून उठवले. पुढील चार तास पावसाने मुंबईसह इतरत्र महामुंबई भागाला अक्षरशः झोडपून काढले. तब्बल 103.2 मिमि पावसाची नोंद यावेळी झाली. कुलाबा वेधशाळेने दक्षिण मुंबईत 58.6 मिमि पावसाची नोंद केली. असा पाऊस मुसळधार पाऊस ठाणे, नवी मुंबई, पालघर, पनवेल या भागांत कोसळला. हवामान खात्यानुसार हा पाऊस मुसळधार समजला जातो.