मुंबईत साकारणार बुर्ज खलिफापेक्षाही उंच इमारत

0

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षाही मोठी आणि अलिशान इमारत बांधण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. नितीन गडकर यांच्या या ड्रीम प्रोजेक्टपर्यंत पोहोचण्यासाठी मरीन ड्राइव्हपेक्षाही मोठा रस्ता तयार केला जाईल. तसेच या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहेत.

वृत्तसंस्था पीटीआयसोबत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मुंबईत आमच्याकडे सर्वात जास्त जमीन आहे. प्रसिद्ध ताज हॉटेल, बलार्ड एस्टेट, रिलायन्स बिल्डिंग, यांचे आम्ही (मुंबई पोर्ट ट्रस्ट) मालक आहोत. बंदराला लागून असलेली जमीन विकसित करण्याची योजना चांगली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील येण्याची वाट पाहत आहोत. ही जमीन आम्ही कंत्राटदार किंवा गुंतवणूकदारांना देणार नाही. तसेच या परिसराचा विकास करण्याची योग्य योजना आमच्याकडे आहे. मरीन ड्राइव्हपेक्षाही मोठा आणि ग्रीन, स्मार्ट रस्ता बनवणार आहोत. तसेच बुर्ज खलिफापेक्षाही भव्य ऐतिहासिक इमारत बांधण्याची आमची योजना आहे. यासाठीचा प्लॅन तयार असून केवळ कॅबिनेटच्या मंजुरीची आवश्यकता आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

जगातील सर्वाधिक मोठी इमारत म्हणून दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीची ओळख आहे. ही इमारत अ‍ॅन्टीनेसह तब्बल 2 हजार 722 फुट उंच आहे. 2004-2009 या अवघ्या 5 वर्षांत ही इमारत उभी करण्यात आली. अबुदाबीचे सत्ताधीश आणि युनायटेड अरब अमिरातीचे अध्यक्ष खलिफा बीन झयद अल नह्यान यांनी या इमारतीचे नामकरण केले. एद्रीन स्मीथ यांनी या इमारतीचा आराखडा बनवला. त्यांनीच अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर या जुळ्या इमारतींचा आराखडा बनवला होता. या इमारतीला बरेच जागतिक पुरस्कार मिळाले आहेत.