मुंबई । मुंबई महापालिका निवडणूकीत मराठी समाज ज्या ठिकाणी आहे.त्याठिकाणी सेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.त्यामध्ये लालबाग, परळ, वरळी, प्रभादेवी, दादर, माहिम या मराठी पट्ट्यात यश मिळाले.सेनेने अमराठी विशेष करून गुजराथी समाजाचा विश्वास जिकण्यासाठी गुजरातमधील पाटीदार पटेल आरक्षण समितीचा नेता हार्दिक पटेलला प्रचारासाठी आणले.मात्र शिवसेनेच्या या खेळीचा काहीच फायदा झाला नाही हे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेतर्फे होते 11 गुजराती उमेदवार
भाजपा-सेना यांची युती तुटल्यानंतर शिवसेनेने गुजराथी समाज भाजपावर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नोटीबंदीच्या निर्णयावर नाराज असेल असे धरून त्याला आकर्षित करण्यासाठी गुजरातमधील हार्दिक पटेलला सेनेने आणले होते. त्याचबरोबर सेनेने 11 गुजराती उमेदवार दिले होते. पण त्यातील एकही निवडून येऊ शकला नाही. मुंबईतील गुजराती समाज प्रामुख्याने व्यापारी आणि व्यावसायिक आहे. हा समाज भाजपाचा पारंपारिक मतदार समजला जातो. उपनगरातील घाटकोपर, मुलुंड, मालाड, कांदिवली आणि बोरिवली या पट्टयात भाजपाने चांगले यश मिळवले. इथल्या 49 पैकी 36 जागा भाजपाने जिंकल्या. भाजपाबरोबरची युती तुटल्यानंतर शिवसेनेने गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यामुळे शिवसेना व्होट बँक म्हणून आपल्याकडे पाहत आहे अशी मतदारांची भावना झाली तसेच यापूर्वीची शिवसेनेची पार्श्वभूमी गुजराती विरोधाची होती. त्यामुळे गुजराती मतदार भाजपाच्या पाठिशीच ठामपणे उभा राहिला, असे या समाजाच्या एका नेत्याने सांगितले. मुंबईतील गुजराती समाज जनसंघाच्या दिवसांपासून भाजपासोबत आहे. 60च्या दशकात जयवंतीबेन मेहता जनसंघाच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या.