मुंबईत 6 वर्षांत 29 हजार 140 आगीच्या दुर्घटनेत 300 बळी

0

मुंबई । मुंबईत आगीत होरपळून 300 जणांचे प्राण गेले आहेत. गेल्या सहा वर्षांत तब्बल 29 हजार 140 आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. यात घटनांमध्ये 925 जण जखमी झाले आहेत. मुंबईत 2012 पासून 2018 पर्यंत किती आगीच्या दुर्घटना घडल्या? या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला? याबाबत आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी अग्निशमन दलाकडे विचारणा केली होती. मुंबई अग्निशमन दलाचे जनमाहिती अधिकारी व विभागीय अग्निशमन अधिकारी ए. वी. परब यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 2012 पासून एप्रिल 2018 पर्यंत एकूण 29 हजार 140 आगीच्या घटना घडल्या. यात तीनशे लोकांचा मृत्यू झाला, तर 925 लोक जखमी झाले. यात 120 अग्निशमन दलाच्या अधिकारी- कर्मचार्‍यांचा समावेश आहे. 2012-2013 या वर्षात 4 हजार 756 आगीच्या दुर्घटनेत 62 लोकांचा मृत्यू झाला. यात 44 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश आहे.

या वर्षी 177 लोक जखमी झाले असून, त्यात 139 पुरुष आणि 38 महिलांचा समावेश आहे, तर 13 अग्निशमन दलाचे अधिकारी-कर्मचारी जखमी झाले आहेत. 2013-2014 मध्ये एकूण 4400 आगीच्या दुर्घटना घडल्या. यात 58 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 141 लोक जखमी झाले आहेत. 2014-2015 मध्ये एकूण 4 हजार 842 आगीच्या घटना घडल्या. यात 32 लोकांचा मृत्यू झाला, तर 125 लोक जखमी झाले आहेत. या घटनेत अग्निशमन दलाच्या एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आणि एकूण 31 अग्निशमन दलाचे अधिकारी-कर्मचारी जखमी झाले.

2015-2016 मध्ये 5 हजार 12 आगीच्या घटना घडल्या. यात 47 लोकांचा मृत्यू झाला, तर 128 लोक जखमी झाले. 2016-2017 मध्ये 5 हजार 21 आगीच्या घटना घडल्या. यात 34 लोकांचा मृत्यू झाला, तर 115 लोक जखमी झाले. या घटनेत अग्निशमन दलाच्या एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. 2017-2018 मध्ये 4 हजार 27 आगीच्या घटना घडल्या. यात 55 लोकांचा मृत्यू झाला असून, 219 लोक जखमी झाले. जानेवारी 2018 पासून एप्रिल पर्यंत एकूण 710 आगीच्या घटना घडल्या. यात 5 लोकांचा मृत्यू झाला असून, 20 लोक जखमी झाले आहेत.