शिरपूर । मुंबई संघावर विजय मिळविणार्या शिरपूर क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंचे स्वागत करुन त्यांना अतिशय मोठया आकाराची ट्रॉफी माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते जनक व्हीला, आमदार निवास येथे बहाल करण्यात आली. त्यानंतर शिरपूर शहरातून खेळाडूंची सवाद्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. रॅलीचा समारोप आर.सी.पटेल मेन बिल्डींग येथे करण्यात आला.
नागरिकांचा उस्फुर्त सहभाग
सर्व यशस्वी खेळाडू, कोच यांना सजविलेल्या वाहनांवर विराजमान करण्यात आले होते. रॅलीत वाहनांच्या मागे विविध शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रिकेटप्रेमी मोठया संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी किरणबेन पटेल, राजगोपाल भंडारी, प्रभाकरराव चव्हाण, नाटुसिंग गिरासे, प्रितेश पटेल, डॉ.उमेश शर्मा, राहुल दंदे, राजेंद्र अग्रवाल, नितीन गिरासे, देवेंद्र राजपूत, शामकांत ईशी, जाकिर शेख, राजेंद्र पंडीत व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
संघात होता या खेळाडूंचा समावेश
शिरपूरच्या 19 वर्षे खालील क्रिकेट संघाला मुंबई येथील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बी.के.सी.) येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या भव्य मैदानावर खेळण्याची सुवर्ण संधी मिळाल्याने शिरपूरसह क्रिकेटविश्वात कौतुक केले जात आहे. या संघाचा कर्णधार प्रसाद सोनवणे होता. संघात प्रशांत ढोले, तरुण देवरे, अनिकेत मोरे, दानेश पटेल, जयदेव पाटील, प्रशांत बिलाडे, परेश पटेल, प्रफुल्ल धनगर, राहुल गिरासे, तरवेश पाटील, आनंद जगताप, लोकेश देशमुख, कुणाल गिरासे, प्रितेश सोनवणे, सागर सोनवणे यांनी अतिशय चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.
विजयी खेळाडूंचे कौतुक
क्रिकेटवीरांची विजयी रॅली जनक व्हीला आमदार कार्यालयापासून मेनरोडने सरळ विजयस्तंभ, बाजारपेठ, मारवाडी गल्ली, नगरपरिषदे समोरुन काढण्यात आली. विजय-रॅलीचा समारोप आर. सी. पटेल मेन बिल्डींग येथे करण्यात आला. येथे संस्थेचे सचिव प्रभाकरराव चव्हाण यांनी रॅलीस संबोधून सर्व विजयी खेळाडूंचे कौतुक केले. मुंबई येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बी.के.सी.) येथे झालेल्या मुंबई विरुदध शिरपूरच्या सामन्यात शिरपूरच्या क्रिकेटवीरांनी बाजी मारून चषक पटकावला.