मुंबई: राज्यभरात दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने जनजीवनावर याचा परिणाम होतो आहे. मुंबई आणि उपनगर परिसराला दोन दिवसांपासून पावसाने अक्षरश: झोडपले आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान आज देखील मुंबई, ठाणे आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत रात्री पासून पावसाने थोडीशी उसंती घेतल्याने रेल्वे सेवा पुन्हा सुरु झाली आहे. मात्र आज पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.