मुंबई: गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण महराष्ट्रात संततधार सुरु आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान मुंबईत पुन्हा जोरदार पाऊस सक्रीय झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ४ आणि ५ ऑगस्ट रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नदीकिनारी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघरसह उत्तर कोकण भागात पुढील ४ ते ६ तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने मलाड, अंधेरी, दहीसर सबवेमध्ये पाणी साचले. दुपारी १ वाजून ४४ मिनीटांनी ४.९० मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मदतीसाठी तैनात लाइफ गार्ड्सची मदत घ्या किंवा १९१६ किंवा १०१ वर संपर्क करा. महानगरपालिकेकडून नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याचा तसंच गरज असली तरच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.