नोएडा : उत्तर प्रदेश एटीएसने देशातील पाच राज्यातील पोलिसांच्या मदतीने दहशतवादी कट रचल्याच्या आरोपाखाली 6 संशीयीत दहशतवाद्यांना अटक केली. तर अन्य तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीवरून उत्तर प्रदेशातील बिजनौर, मुजफ्फरनगर, महाराष्ट्रातील मुंबई, पंजाबमधील जालंधर आणि बिहारमधील नरकटियागंज येथे विशेष तपास मोहिम राबविण्यात आली. दरम्यान, उत्तर प्रदेश एटीएसने तीन जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. एटीएस आयजी असीम अरूण यांनी सांगितले की, पुरावे मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
नकाशे, डायरी सापडली
वेगवेगळ्या राज्यांमधून एकुण 6 जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी चौघांविरूध्द पुरावे सापडले आहेत. ही कारवाई बुधवारी मध्यरात्री उत्तर प्रदेश एटीएसने पाच राज्यातील पोलिसांच्या मदतीने पार पाडली. गुरूवारी सकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती. या कारवाईत उत्तर प्रदेश पोलिसांसोबत दिल्ली पोलिसांचे विशेष पथक, आंध्र प्रदेश पोलिस, महाराष्ट्र एटीएस, पंजाब आणि बिहार पोलिस सहभागी झाले होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिजनौर येथून अटक केलेल्या तिघांकडे काही नकाशे मिळाले असून एक डायरी देखील सापडली आहे. या डायरीत कटाशी संबंधीत लोकांची नावे आहेत. पकडण्यात आलेल्या सर्व 9 संशयीत दहशतवाद्यांना नोएडा येथे नेण्यात आले असून तेथेच त्यांची चौकशी होणार आहे.
गट बनविण्याची तयारी
उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेले संशयित दहशतवादी हे एक मोठे दहशतवादी कृत्य पार पाडण्याच्या तयारीत होते. तसेच यासाठी एक गट तयार करण्याच्या प्रयत्नात होते.
इसिसशी संबंधित असल्याचा आरोप
दिल्ली पोलिस आणि उत्तर प्रदेश एटीएसने पकडण्यात आलेले 9 जण इसिसशी संबंधीत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. परंतु अद्याप त्यांचा इसिसशी संबंध असल्याचा ठोस पुरावा मिळालेला नाही. इसिसने पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये आपल्या कारवाया पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न चालवला आहे. उत्तर प्रदेश एटीएसला यासंबंधीची माहिती सातत्याने मिळत असल्याने ही कारवाई करण्यात आली.
उत्तर प्रदेशात दहशतवादी सक्रिय
7 मार्चच्या सकाळी शाजापुरमध्ये भोपाळ पॅसेंजर ट्रेनमध्ये मोठा स्फोट झाला होता. यामध्ये 10 प्रवाशी जखमी झाले होते. या स्फोटानंतर दुपारी मध्य प्रदेश पोलिसांनी पिपरिया येथील एका टोल नाक्यावर बस थांबवून 4 संशयितांना पकडले होते. या चौघांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेश एटीएसने कानपुरमधून दोघांना आणि इटावातून एका संशयिताला ताब्यात घेतले होते. यातून मिळालेल्या महितीच्या आधारे पुन्हा लाखनौ येथे दहशतवादी सैफुल्लाहला ठार करण्यात आले होते. 11 तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये सैफुल्लाहला ठार केल्यानंतर त्याच्याजवळ 8 रिव्हॉल्वर, 650 काडतूसे, अनेक बॉम्ब आणि रेल्वेचे नकाशे सापडले होते.