मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचे धुमशान

0

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेणार्‍या पावसाने रविवारी मुंबईसह महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह, विजेच्या लखलखाटासह पावसाचे पुनरागमन झाले. नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि उपनगरात धुमशान घातले. रात्री सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर तुफान बरसला. पावसाने मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पुनरागमन केले. मुंबई आणि उपनगरांसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, भाईंदर, वसई-विरार, पालघर आदी भागांमध्येही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. रात्रभर पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले.

कामावर निघालेल्या प्रवाशांना मनस्ताप
मुंबई उपगनर, ठाणे, पालघर, मीरा-भाईंदर या शहरांमध्ये शनिवारी रात्रीपासून पावसाने चांगलीच बॅटिंग केली. पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. कळवा स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने धिम्या मार्गावरील वाहतूक मंदावली होती. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल ट्रेन मंदगतीने धावत होत्या. यामुळे सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला. जलद मार्गावरील वाहतूकही विलंबानेच सुरू होती. दुसरीकडे पावसामुळे ठाणे, डोंबिवलीतील काही भागांमध्ये पाणी साचल्याची तक्रार स्थानिकांनी केली.

ठाणे मनपाची भिंत कोसळली
ठाण्यातील मानपाडा येथील नीळकंठ परिसरात महापालिका कार्यालयाची भिंत कोसळल्याची घटना घडली. यात दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. कळवा आणि ठाण्यामध्ये मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूकही खोळंबली. कळवा स्थानकात रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने धिम्या मार्गावरील वाहतूक थांबली. त्यामुळे धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून वळवण्यात आल्या होत्या. परिणामी, मध्य रेल्वेच्या काही लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. काही वेळाने धिम्या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. पण लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले.

सहा तासांचा होता मेगाब्लॉक
रविवारी मध्य रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक होता. मेगाब्लॉगच्या काळात ठाकुर्ली स्थानकाजवळील फाटक बंद करून तेथे उभारण्यात येणार्‍या पुलाच्या गर्डरचे काम करण्यात येणार होते. या कामासाठी अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 9.15 ते दुपारी 3.15, अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 9.15 ते दुपारी 12.45 वाजेपर्यंत, तर 5-6व्या रेल्वे मार्गावर सकाळी 9.15 ते दुपारी 3.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक होता.

कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातही दमदार पाऊस
भिंवडी, पालघर, ठाणे, कोकण सर्वच भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी कम्पाउंड वॉल्स, तर काही ठिकाणी झाडेही पडली. कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी जनजीवन विस्कळीत झाले आहे. याशिवाय कोल्हापूर, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात ही पावसाने दमदार हजेरी लावली. पालघरमधल्या विक्रमगडमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 324 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर इथल्याच तलासरी तालुक्यात तब्बल 468 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र आहे. संततधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, आज पहाटे 4 वाजल्यापासून इथली वाहतूक ठप्प आहे, तर गेल्या 20 तासांपासून विक्रमगड परिसरातला वीजपुरवठा खंडित झाला आहे.

खवय्यांनी लुटला शाकाहारी, मांसाहारी भजांचा आनंद
पाऊस, गरमागरम भजी आणि चहा हे सगळ्यांचे अगदी आवडीचे कॉम्बिनेशन. याच पावसाळी चिंब वातावरणाचा आनंद वाढवण्यासाठी मुंबईच्या दादरमध्ये भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी संध्याकाळी या महोत्सवाला सुरुवात झाली. दादर सांस्कृतिक मंचाने आयोजित केलेल्या या महोत्सवात खवय्यांना 30 प्रकारच्या भज्यांची चव चाखायला मिळाली. यात शाकाहारीमध्ये बटाटा भजी, कांदा भजी, वांगी भजी, मिरची भजी, पालक भजी, मूगडाळ भजी, केळ्याची भजी, कॉर्न भजी, असे असंख्य प्रकार होते, तर मांसाहारी खवय्यांसाठी प्रॉन्स भजी, चिकन भजी, बोंबील भजी, मांदेली भजी, पापलेट भजी, असे भन्नाट प्रकार होते. या महोत्सवाला दादरकरांनी भरभरून प्रतिसाद मिळाला. सर्व वयोगटांतील खवय्यांनी महोत्सवाला अफाट प्रतिसाद दिला.