मुंबई | मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मुख्य स्थानकासाठी वांद्रे-कुर्ला संकुलाऐवजी धारावीतील जागेचा विचार करावा, अशी विनंती केंद्र सरकारला करण्यात आली आहे, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सांगितले. काँग्रेसचे संजय दत्त यांनी याबाबतची चर्चा उपस्थित केली होती. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प फक्त धनदांडग्यासाठी असून यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर भार येईल. त्यामुळे या प्रकल्पाला पर्याय शोधावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चर्चेला उत्तर दिले.
या प्रकल्पामुळे त्याच्या मार्गावरील आदिवासी पट्ट्यात उद्योगधंदे उभे राहतील. तसेच हा मार्ग मुंबईपासून ठाण्यापर्यंत जमिनीखालून जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांची जमीन मोठ्या प्रमाणात संपादित होणार नाही. भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाप्रमाणे योग्य तो मोबदला मिळेल असे त्यांनी सांगितले. सुमारे एक लाख कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून यासाठी 80 टक्के कर्ज जपानी बॅँकेकडून मिळणार आहे तर 20 टक्के हिश्श्यापैकी केंद्र सरकार दहा टक्के तर उर्वरित दहा टक्के हिस्सा महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचा असणार आहे. जपानी बॅँकेचं कर्ज 50 वर्षांसाठी असून पहिल्या 10 वर्षांसाठी कर्जफेड करावी लागणार नाही. राज्याला सुरूवातीला 125 कोटी रूपये द्यावे लागतील अशी माहितीही त्यांनी दिली. या बुलेट ट्रेनचे भाडे विमानाच्या तिकिटापेक्षा दीडपट असेल. मात्र, विमानाने जाण्यायेण्यात जो वेळ जातो त्यापेक्षा ही ट्रेन लवकर पोहोचणार आहे. या प्रकल्पासाठी मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुलातली जमीन देण्यात आलेली नाही. या संकुलातली फक्त नऊ दशांश हेक्टर जागा देण्याचे प्रस्तावित आहे. वांद्रे-कुर्ला संकुलाऐवजी धारावीत मुख्य स्थानक करावे, अशी विनंती केंद्राला करण्यात आली आहे, असेही रावते यांनी सांगितले.
मुंबई-कोलकाता, या प्रस्तावित बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर मार्गे नेण्यात यावा, अशी विनंतीही केंद्र सरकारला करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. राहुल नार्वेकर, नीलम गोऱ्हे यांनी चर्चेत भाग घेतला.