मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा गुरूवारी शुभारंभ

0

अहमदाबाद : मुंबई-अहमदाबाद या देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ गुजरातमधून होत असून जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांचे या प्रकल्पाच्या शुभारंभासाठी बुधवारी गुजरातमध्ये आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंजो यांचे स्वागत केले. ते दोन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले आहेत. अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे भूमिपूजन आज गुरूवारी होणार आहे.

जपानच्या सहकार्याने प्रकल्प
शिंजो अ‍ॅबे यांच्यासह त्यांची पत्नीदेखील भारतात आल्या आहेत. नरेंद्र मोदी, अ‍ॅबे आणि त्यांच्या पत्नीने विमानतळावरुन साबरमती आश्रमापर्यंत रोड शो केला. आबे यांच्या पत्नीचा भारतीय पेहराव बघून सारेच आश्चर्यचकीत झाले. रस्त्याच्या दुतर्फा स्थानिकांनी गर्दी केली होती. रोड शोच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यानंतर साबरमती आश्रमात त्यांनी महात्मा गांधी यांनी आदरांजली अर्पण केली. शिंजो अ‍ॅबे यापूर्वीही भारतात आले असले तरी यावेळी त्यांचा दौरा भारतासाठी खास आहे. या दौर्‍यात शिंजो आबे भारताला बुलेट ट्रेनची भेट देणार आहेत. जपानच्या सहकार्याने सुरू होत असलेल्या या प्रकल्पाची किंमत 1.8 लाख कोटी रुपये आहे. हा प्रकल्प ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. याशिवाय अन्य दहा सामंजस्य करारांवरही मोदी-अ‍ॅबे भेटीत स्वाक्षर्‍या होतील. आपल्या दोन दिवसाच्या दौर्‍यात शिंजो आबे गुजरातमध्येच राहणार आहेत.

आज मोदी-शिंजो बैठक
जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे गुरूवारी दिवसभर गुजरातमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तसेच एक महत्वपुर्ण बैठक देखील दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये होणार आहे. सकाळी 9.50 वाजता भारतातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद-मुंबईचं भूमीपूजन, सकाळी 11.30 वाजता दांडी कुतीरला भेट, दुपारी 12 वाजता उच्चस्तरीय चर्चा, दुपारी 1 वाजता दोन्ही देशात करार आणि पत्रकार परिषद, स्थळ- महात्मा मंदिर, दुपारी 2.30 वाजता भारत-जपान बिझनेस लिडर ग्रुप फोटो, दुपारी 3.45 वाजता महात्मा मंदिरातील कॉन्व्हेंन्शन हॉलमधील प्रदर्शन पाहणी, असे कार्यक्रम होणार असून रात्री 9.35 वाजता शिंजो आबे टोकियोला रवाना होणार आहेत.