मुंबई अहमदाबाद महामार्गावर हजारो रुपयांचा गुटखा जप्त

0

मनोर । महाराष्ट्र राज्यात सुगंधित पान मसाला गुटख्यास बंदी असून त्याची तस्करी गुजरात राज्यातून मोठ्याप्रमाणात होत आहे. याचा प्रत्यय नुकताच मनोर येथील पोलीस ठाण्याला आला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 18 फेब्रुवारी रोजी मनोर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपासणी नाका लावला होता. यावेळी गुजरातकडून येणार्‍या वाहनांची तपासणी केली जात असताना समोरून येणारा आयशर टेम्पो क्र. जी. जे. 15 – ए. टी. 4964 चा चालक पोलिसांची नजर चुकवून पळवून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याचा पाठलाग करून पकडण्यात आले. त्यावेळी टेम्पो चालकास पोलिसांनी त्याचे नाव व गाव विचारले असता त्यांनी सलमान नसिम अहमद, वय 22 वर्षे, रा. डोंगरीफलिया (वापी) असे सांगितले. यानंतर गाडीमधील मालाची चौकशी केली असता गाडीमध्ये कापडाच्या जुन्या चिंध्या आहेत असे सांगितले. परंतु चौकशी दरम्यान चालक उडवाउडवीची उत्तरे देतोय, हे पोलिसांच्या लक्षात आल्याने टेम्पोची कसून तपासणी केली असता. त्यामध्ये कापडाच्या जुन्या चिंध्याचा माल नसून त्यास सुगंधी गुटख्यासारखा वास येत असल्यामुळे गाडीतील एक गाठोडे पोलिसांनी बाहेर काढून तपासणी केली. त्यामध्ये सुगंधी पान मसाला गुटखा असल्याची खात्री पटली. एकीकडे महाराष्ट्र शासनाने सुगंधी पान मसाला गुटख्याला राज्यात विक्रीला बंदी घातलेली असून चोरट्या मार्गाने सर्रास विक्री चालू आहे.

चोरट्या मार्गाने वाहतूक करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई
जवळच्या गुजरात राज्यातून गुटख्याची तस्करी होत असल्याचे दिसून आले आहे. चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी केली असता सदरचा माल वसीम शेख, रा. गोवंडी (मुंबई) यास पोच करावयास गुड्डू या इसमाने सांगितले होते. गुड्डूचे पूर्ण नाव माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मनोर पोलिस ठाण्यामध्ये नोंद केली. पुढील कार्यवाहीसाठी अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन, ठाणे यांना पत्राव्दारे कळविण्यात आले आहे. अन्न व सुरक्षा अधिकारी मूळे यांनी 21 फेब्रुवारी रोजी 3 वाजता मनोर येथे येऊन पकडण्यांत आलेल्या सुगंधित पान मसाला गुटखा बेकायदेशीर मालाचा पंचनामा केला. या कार्यवाहीत एकूण गुटखा 1228140/- किंमतीचा असून टेम्पोसहित 2328140/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी मनोर पोलिस ठाण्याचे स.फौ. सी. एन. गायकवाड, पो. हवा. महाजन व पवार, पो. ना. गाडेकर व शिवाजी भोईर यांनी कामगिरी बजावली असून चोरट्या मार्गाने वाहतूक करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे.