मुंबई-आंध्र प्रदेश रणजी लढत अखेर राहिली अनिर्णीत

0

ओंगोल । मुंबई आणि आंध्र प्रदेश यांच्यातील रणजी लढत अखेर अनिर्णीत राहिली, पण पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या जोरावर मुंबईला तीन गुण मिळाले तर आंध्रला एका गुणावर समाधान मानावे लागले. रणजी क्रिकेट स्पर्धेच्या क गटात आता मुंबई 14 गुणांसह तिसर्‍या स्थानी असून आंध्र प्रदेश 19 गुणांसह अव्वलस्थानी आहे. मध्य प्रदेशच्या खात्यात 15 गुण आहेत आणि ते दुसर्‍या स्थानावर आहेत. प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ बाद फेरीत प्रवेश करणार आहेत. प्रत्येक संघ 6 सामने खेळणार असून मुंबईच्या आता 5 लढती झाल्या आहेत. मुंबईची अंतिम साखळी लढत दुबळ्या त्रिपुराशी 25 नोव्हेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर रंगेल. त्यानंतर बाद फेरीच्या सामन्यांना 7 डिसेंबरपासून प्रारंभ होईल.

मुंबईचा तिसर्‍या क्रमांकाचा फलंदाज श्रेयस अय्यरने तिसर्‍या दिवशी 75 धावांपर्यंत मजल मारली होती. त्याने चौथ्या व अखेरच्या दिवशी 89 धावा केल्या आणि त्यामुळे मुंबईने आपल्या दुसर्‍या डावात 279 धावांपर्यंत मजल मारत डाव घोषित केला. पहिल्या डावात मुंबईने 332 धावा केल्या होत्या आणि त्याला आंध्रने 215 धावांचे उत्तर दिले होते. दुसर्‍या डावानंतर मुंबईने आंध्रपुढे विजयासाठी 397 धावांचे आव्हान ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना आंध्रने 5 बाद 219 धावा केल्या, पण सामना अनिर्णीत राहिला. या दुसर्‍या डावात आंध्रच्या के.एस. भारतने 68 धावांची खेळी केली, तर रिकी भुईने 55 धावा केल्या. या डावात मुंबईचा यशस्वी गोलंदाज ठरला कर्ष कोठारी. त्याने 55 धावांत 3 बळी घेतले, तर पहिल्या डावात पाच बळी घेणार्‍या शार्दुल ठाकूरने 52 धावांत 2 बळी घेतले.