मुंबई-आग्रा महामार्गावरील बाभळे फाट्यावर दरोडा : दिड लाखांची लूट

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्याजवळ 8 ते 10 अज्ञात दरोडेखोरांनी चारचाकी वाहन पंक्चर करीत वाहनातील एकाला काठीने मारहाण करीत दहशत निर्माण केली व 55 हजारांच्या रोकडसह महिलांकडील दागिने मिळून सुमारे दोन तोळे वजनाचा ऐवज लुटून पळ काढला. सोमवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने धुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

बाभळे फाट्यावर पहाटेच्या सुमारास दरोडा
मालेगाव तालुक्यातील गाळणे येथील मूळचे रहिवासी असणारे कैलास जाधव हे आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन इंदौरकडून नाशिक येथे जात असताना सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बाभळे फाट्यावर आल्यानंतर दरोडेखोरांनी वाहन पंक्चन होईल या बेताने रस्त्यात टोकदार पट्टी अंथरली होती व वाहन त्यावरून जाताच ते पंक्चर झाल्याने वाहनातील लोक खाली उतरले व स्टेपनी बदलवली जात असताना अंधारातून आलेल्या आठ ते दहा हिंदी भाषिक दरोडेखोरांनी सुरूवातीला कैलास जाधव यांना काठीने बेदम मारहाण करीत दहशत निर्माण केली तसेच त्यांच्यासोबत असणार्‍या महिलांकडील सोने हिसकावले व वाहनातील इतरांकडून सुमारे 55 हजारांची रोकड हिससकावून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी अनिल माने, धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांनी धाव घेत माहिती जाणून घेतली. दरोडेखोर 25 ते 30 वयोगटातील असून ते हिंदी भाषा बोलत असल्याचे सांगण्यात आले शिवाय ते परराज्यातील असल्याचा कयास असून तक्रारदाराच्या वर्णनावरून त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.