मुंबई । मुंबई आणि परिसरात कालपासून पुन्हा एकदा धुक्याची चादर पसरली होती. कालप्रमाणे आजही मुंबईत असेच धुरकट वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मुंबईचे आकाश निरभ्र असले, तरी जमिनीलगतच्या वातावरणात पहाटेपासूनच धुराचे ढग पसरले होते. परिणामी, मुंबईच्या काही विभागांतील हवेची गुणवत्ता आरोग्याला हानिकारक असणार्या पातळीपर्यंत ढासळल्याची नोंद करण्यात आली. ‘सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अॅण्ड वेदर फोरकास्टिंग अॅण्ड रिसर्च’ संस्थेने मुंबईतील हवेची शुद्धता पडताळली. त्यात मुंबईतील हवेचा दर्जा बराच घसरल्याचा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुंबईत पुढील काही दिवसांमध्ये विषाणूजन्य आजारांचे प्रमाण बळावण्याची शक्यता तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
हवेत धूळ, धुराचे कण जमले
भारताच्या दक्षिण किनारपट्टीलगत आलेल्या ‘ओखी’ वादळामुळे आठवड्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसानंतर हवामानातील बाष्पाचे प्रमाण वाढले. शनिवारी आणि रविवारीही हवेतील बाष्पाचे प्रमाण बर्यापैकी वाढले होते. घसरते तापमान आणि समुद्राकडून येणारे बाष्प यामुळे हवेतील धूळ आणि धुराचे कण हवेत जमायला सुरुवात होते आणि यातूनच विरळ धुक्यांची निर्मिती होते. मुंबईत सामान्यपणे थंडीच्या दिवसांमध्ये असे विरळ धुके जमा होऊन दृश्यमानता कमी होत असते.
थंडीचा कडाका वाढल्याने प्रदूषण
या धुक्याच्या प्रभावामुळे मुंबईच्या हवेत रोगराई पसरवण्यासाठी मदत होणार्या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने शहरात पुन्हा साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ‘चांगल्या’ पातळीपर्यंत होता. त्यानंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढला आणि धुक्याचे वातावरण कायम बनल्यामुळे प्रदूषणाचा निर्देशांक खालावला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा प्रदूषण वाढले.