मुंबई उपनगरने पुण्याची मक्तेदारी मोडली

0

सातारा । लिबर्टी मजदूर संघ आयोजित 66व्या पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने पुण्याची अकरा वर्षांची विजयी परंपरा खंडित करीत 30-23 असा विजय मिळवत पार्वतीबाई सांडव चषक आपल्या नावे केला. या विजयासाठी त्यांना फार प्रतीक्षा करावी लागली. मागील अकरा वर्षामध्ये मुंबई उपनगर संघाने सहा वेळा त्यांनी अंतिम फेरीत धडक दिली होती. पण प्रत्येक वेळी त्यांना अपयशाला सामोरी जावे लागले. यंदा मात्र उपनगरला यश आले. पुरुषांच्या लढतीत मात्र पुणे संघाने कोल्हापुरचा पराभव करत सलग दुसर्‍या वर्षी विजेतेपद कायम राखले. स्पर्धेच्या नियोजित कालावधीत अवेळी झालेल्या पावसामुळे स्पर्धेतील निर्णायक फेरीचे सामने नंतर खेळवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि आयोजकांनी घेतला होता. निर्णायक लढतीच्या सुरुवाती पासून सावध खेळ करीत मुंबई उपनगर संघाने मध्यांतराला 12-11अशी आघाडी घेतली. मध्यांतरानंतर आपल्या आक्रमकतेची धार वाढवित पहिल्या पाच मिनिटांत पुण्यावर पहिला लोन देत 17-14अशी आघाडी घेतली. शेवटच्या पाच मिनिटांत आणखी एक लोण देत ती 28-20 अशी भक्कम केली.

पुण्याच्या सिद्धार्थ देसाईने 14 चढायात 7 गुण घेतले. एक पकड देखील त्याने पकड यशस्वी केली. विराज लांडगेने 4 पकडी यशस्वी केल्या. अक्षय जाधवने 2पकड यशस्वी केल्या त्याच बरोबर एक बोनस व एक गुण देखील घेतला. कोल्हापूर कडून तुषार पाटीलने 18 चढायात 2बोनस व 7 गुण असे 9 गुण मिळविले. त्यांने एक अव्वल पकड देखील यशस्वी केली. विनायक सुतकेने 3 यशस्वी पकडी केल्या. निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या इतिहासात त्यांना एकदाच विजेतेपद मिळविण्यात यश प्राप्त झाले होते. शिरोळ-कोल्हापूर येथे 2003साली झालेल्या स्पर्धेत त्यांनी विजेतेपद मिळविले होते. या अगोदर झालेल्या पुरुषांच्या उपांत्य सामन्यात कोल्हापुरने सांगलीचा चुरशीचा लढा 5-5चढायांच्या जादा डावात 36-33(8-5)असा परतवीत अंतिम फेरीत धडक दिली होती.

शेवटच्या मिनटात केला विजय निश्‍चित
शेवटची तीन मिनिटे सावध खेळ करीत उपनगरने पुण्याला चढाईत एक-एक गुण देत आपला विजय निश्‍चित केला. उपनगरच्या कोमल देवकरने आपल्या 17 चढायात 7 गुण मिळविले, तर एक पकड यशस्वी केली. सायली नागवेकरने 10 चढायात 1 बोनस व 5 गुण असे एकूण 6गुण प्राप्त केले. सायली जाधवने 3 यशस्वी पकडी केल्या. अभिलाषाने 11 चढाया केल्या व 2बोनस आणि 1 गुण मिळविला. पुण्याकडून आम्रपाली गलांडे हिने 8चढायात 1 बोनससह 5 गुण मिळविले. पूजा शेलारचा देखील प्रभाव पडला नाही. तिनेदेखील 8चढायात एक बोनससह 5गुण मिळविले. पुण्याने 2006साली चिपळूण- रत्नागिरी येथे झालेल्या निवड स्पर्धेत मुं. उपनगरचाच पराभव करून या विजयाची मुहूर्तमेंढ रोवली होती.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात पुण्याने कोल्हापूरचा कडवा प्रतिकार 5-5 चढायांच्या जादा डावात 30-29(6-5)असा पराभव करत श्रीकृष्ण करंडक पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून आणला. सुरुवातीपासून गुण घेत गतविजेत्या पुण्याने सामन्यावर आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला, पण कोल्हापूरने जोरदार प्रतिउत्तर देत आपल्याकडे आघाडी खेचून आणली. मध्यांतराला 13-11 अशी आघाडी कोल्हापूरकडे होती. शेवटच्या तीन मिनिटापर्यंत ही आघाडी 24-18 अशी टिकवण्यात त्यांना यश आले. पण पुण्याच्या मोमीन शेखच्या चढाईत कोल्हापूरचे 4 गडी शिल्लक असताना राजू कोरवेला मारून राखीव क्षेत्रात गेला. शेखचे अपील पंचांनी उचलून धरले. यानंतर कोल्हापूरवर लोण देत पुण्याने 24-24अशी बरोबरी साधण्यात यश मिळवले. सामना बरोबरीत संपल्यामुळे 5-5चढायांचा जादा डाव खेळविण्यात आला. सामना जादा डावातही चुरशीने खेळला गेला. कोल्हापूरची शेवटची चढाई शिल्लक असताना 5-5अशी बरोबरी होती. कोल्हापूरच्या विनायक सुतकेने ही चढाई केली. पुण्याच्या खेळाडूंनी त्याची पकड करत पुण्याला सलग दुसरे विजेतेपद मिळवून दिले.