मुंबई : परिवर्तन घडायचे असेल, तर मोठ्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढणे अगत्याचे असते. गेल्या लोकसभा मतदानात नरेंद्र मोदी यांनी देशभर प्रचाराची धमाल उडवून दिली आणि विक्रमी मतदान झाले होते. एकूण १४ कोटी मतदान वाढले आणि त्यातले दहा कोटीहून अधिक मतदान भाजपाच्या पारड्यात पडले होते. त्यानेच निकालांची उलथापालथ केली होती. मुंबईत परिवर्तन करायचे तर तसेच मतदानाच्या टक्केवारीत मोठे परिवर्तन घडायला हवे होते. ते झालेले नाही. भाजपा नेत्यांसाठी ती चिंतेची बाब आहे.
शिवसेना १९८५ पासून सतत पालिकेवर आपली हुकूमत ठेवत आली, तेव्हा मराठी मतांच्या टक्केवारीचा विषय चर्चिला गेला. पण मराठी मते मुंबईत किती उरली यापेक्षा प्रत्यक्ष मतदानाना किती मराठी टक्का उतरतो, याचे महत्व सेनेने जाणलेले आहे. म्हणूनच जितके कमी मतदान तितका सेनेचा राजकीय लाभ अधिक झालेला आहे. २००७ वा २०१२ अशा प्रत्येकवेळी मतदानाची टक्केवारी ४० टक्क्यांच्या आसपास राहिली आहे. त्यामुळेच हक्काचे मतदार बाहेर काढण्याच्या बळावर सेनेने महापालिका कब्जात ठेवलेली आहे.
भाजपाला मुंबई काबीज करायची तर मतदानाची टक्केवारी किमान ७-८ टक्के इतकी वाढवण्यावर शक्ती खर्ची घालणे आवश्यक होते. तिथे भाजपाची संघटना तोकडी पडली आहे. कारण मतदानाने नेह्मीची लक्ष्मणरेषा ओलांडलेली नाही. म्हणूनच सेनेचे रणनितीकार खुश आहेत तर भाजपाचे चाणक्य चिंतेत आहेत. या गडबडीत कॉग्रेसला लाभ मिळू नये, अशीही भाजपाच्या नेत्यांची अपेक्षा आहे, सेनेला चुचकारण्याची भाषाही प्रचार संपताच मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतून समोर आलेली आहे.