रत्नागिरी। मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील प्रक्रीया जोरात चालू असताना या चौपदरीकरणाला अडथळा ठरणार्या बांधकामांना 1 सप्टेंबरनंतर हटवण्यात येणार आहे. जागा, इमारत मालकांना मोबदला वाटपाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असला तरी प्रत्यक्षात चौपदरीकरणातील मालमत्तांवर लगेचच हातोडा टाकला जाणार नाही. पावसाळ्यानंतरच शक्यतो 1 सप्टेंबरनंतर त्या दृष्टीने कार्यवाही केली जाणार आहे. चौपदरीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या 11 टप्प्यांमध्ये जेथे 80 टक्के जागा ताब्यात येईल तेथेच ती प्रक्रिया सुरू केली जाणार असून त्या दृष्टीने ठेका घेतलेल्या बांधकाम कंपन्यांनी आराखडा तयार केला असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांकडून प्राप्त झाली आहे.
महामार्ग चौपदरीकरणाच्या भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, संगमेश्वर येथील जागा मालकांना मोबदल्यापोटी 381 कोटी रुपये प्राप्त झाल्यानंतर शहर वगळून चिपळूण तालुक्यातील 13 गावांसाठी 268 कोटी प्राप्त झाले आहेत. मात्र अजूनही 77 कोटीची आवश्यकता असून तशी मागणी करण्यात आली आहे. मुळातच जिल्हयातील कशेडी ते सिंधुदुर्गतील झारापपर्यंत मार्गाच्या चौपदरीकरणासाठी निविदा जाहीर करून ठेकेदारही निश्चित केले आहेत.