मुंबई-गोवा महामार्गाला लागलेय खड्ड्यांचे ग्रहण; वाहनचालक त्रस्त

0

नागोठणे : मुंबई-गोवा महामार्गाच्या पनवेल-इंदापूर या 84 कि. मी. मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम काँग्रेसच्या राजवटीत चालू झाले होते. तेव्हापासूनच ते आजतागायत रखडलेले आहे. सध्या कामाने पुन्हा वेग घेतला असून 47 टक्के काम पूर्ण झाले आहे. महिनाभरात हे काम 50 टक्क्यांपर्यंत गेल्यानंतर बँकांच्या माध्यमातून सरकारकडून या कामासाठी 540 कोटी रुपयांचा निधी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. डिसेंबर 2018 पर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊन हा मार्ग वाहतुकीस खुला झाला असेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 3 मार्चला नागोठण्यात व्यक्त केला होता. मात्र, सध्या नागोठणे- वडखळ हा मार्ग खड्ड्यांनीच व्यापला गेला असल्याने या रस्त्याला सध्या कोण वाली आहे, की नाही! असा संतप्त सवाल वाहनचालक आणि प्रवाशांकडून विचारला जात आहे.

तयार केलेला रस्ता निकृष्ट दर्जाचाच
2011 च्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या 84 किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेगाने प्रारंभ करण्यात आला होता व 2014 ते 15 दरम्यान काम पूर्ण होऊन मार्ग वाहतुकीस खुला होईल असे ठाम आश्वासन देण्यात आले होते. या मार्गात दोन ठेकेदार नेमले जाऊन पळस्पे ते कासू एका ठेकेदाराला आणि कासू ते इंदापूर मार्गाचे काम दुसर्या ठेकेदाराला देण्यात आले होते. मात्र, या मार्गात आजही काही ठिकाणच्या जागा कामाच्या विस्तारासाठी ठेकेदाराच्या ताब्यात आल्या नसल्यामुळे नागोठणेसह अनेक ठिकाणची कामे रखडली असल्याचे स्पष्ट होत आहे. वडखळ-नागोठणे-इंदापूर मार्गात अनेक ठिकाणी रस्त्याचे चौपदरीकरण झाले असले, तरी तयार केलेला रस्ता निकृष्ट दर्जाचाच झाला असल्याने सध्या खड्ड्यांतून रस्ता शोधण्याची वेळ वाहनचालकांवर येत आहे.

खड्ड्यांवर खडी, माती टाकून मलमपट्टी करण्याचा प्रयत्न
गणेशोत्सव 25 ऑगस्टपासून सुरू होत आहे व ऑगस्टच्या दुसर्यात आठवड्यापासून कोकणात जाणार्याऑ चाकरमान्यांच्या संख्येत वाढ व्हायला प्रारंभ होणार आहे. महामार्गात कोलेटी-पळस ते नागोठणे हा साधारणतः 5 कि. मी. अंतराचा मार्ग सध्या खड्ड्यांनी व्यापला गेला आहे. ठेकेदाराचे कामगार या खड्ड्यांवर खडी तसेच माती टाकून त्यावर मलमपट्टी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत असले तरी या कामात वेळकाढूपणाच जास्त दिसत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. रोलर, जेसीबी सारखी यंत्रसामुग्री घेऊन खड्डे भरण्याचे काम होत असूनही खड्डा कायमचा बुजण्याऐवजी दोन दिवसांनी याच खड्ड्यांचे आकारमान वाढले असते असे नागरिकांचे म्हणणे आहे.