प्रलंबित दावे लवकरच निकाली काढणार; महसुलमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई :– मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील पळस्पे-इंदापुर पहिल्या या टप्प्यातील भूसंपादनाविषयी प्रलंबित दाव्यांबाबत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी मागच्या आठवडयात लक्षवेधीद्वारे सभागृहात प्रश्न मांडला होता. दरम्यान महसुलमंत्र्यांनी या लक्षवेधीसंदर्भात बैठक लावून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विधानभवनात महत्वपूर्ण बैठक होवून महसुलमंत्र्यांनी प्रलंबित दावे लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान यासंदर्भात महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानभवनातील कार्यालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला आमदार सुनिल तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, रायगड जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, राज्यमहामार्गाचे प्रकल्प संचालक, प्रादेशिक अधिकारी राज्यमहामार्ग अधिक्षक अभियंता यांच्यासह महसूल,मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम या खात्याचे अधिकारी आणि पुई, खांब, कोलाड, वरसगाव येथील बाधित ग्रामस्थ उपस्थित होते.
या बैठकीमध्ये प्रलंबित दावे लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान वाढीव मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार सुनिल तटकरे यांनी बाधित ग्रामस्थांना यावेळी दिले.