रत्नागिरी – मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॅव्हल्स बसला अपघात झाला आहे. रत्नागिरीत झालेल्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना डेरवणमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
विशाल ट्रॅव्हल्सची बस मुंबईहून मालवणला जात होती. या बसमधील 47 प्रवाशांपैकी बहुतांश प्रवासी परळचे रहिवासी होते. पहाटेच्या वेळी बस चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटली आणि भीषण अपघात झाला. सावर्डे-आगवे वळणावर या अपघातप्रवण क्षेत्राजवळ हा अपघात झाला. यावेळी बसमधील दोन-तीन प्रवासी बाहेर फेकले गेले. बसमधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर सध्या डेरवणच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस उलटल्याने काही प्रवासी बसमध्ये अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे.