मुंबई टी-20 क्रिकेट लीगसाठी नव्याने निविदा

0

मुंबई । बहुचर्चित टी-20 मुंबई लीगमधील संघासाठी पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर देशातील आघाडीच्या मुंबई क्रिकेट संघटनेने पुन्हा एकदा या लीगच्या आयोजनासाठी कंबर कसली आहे. संघ मालक आणि पुरस्कर्ते मिळवता न आल्यामुळे 4 ते 9 जानेवारीदरम्यान होणारी ही लीग अनिश्‍चितकाळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. पण, आता मुंबई क्रिकेट संघटनेने संघमालकांची निवड करण्याकरिता पुन्हा एकदा निविदा मागवल्या आहेत. या लीगच्या आयोजनासाठी एमसीएने अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी त्यात त्यांना अपयश आले.

त्यामुळे आता तरी ही लीग मार्गी लागणार का? की पुन्हा एकदा एमसीए अपयशी ठरणार याची चर्चा रंगली आहे. बीसीसीआयने ही लीग खेळवण्यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेला पाच दिवसांचा अवधी दिला होता. आता ही स्पर्धा आयपीएलच्या आधी 11 ते 21 मार्चदरम्यान खेळवण्याचा निर्णय एमसीएने घेतला आहे. लीगच्या पहिल्या मोसमात सहा संघाना प्रवेश देण्यात येणार असून, या संघाच्या मालकांचा शोध घेण्यास एमसीएने सुरुवात केली आहे. संघ खरेदी करणार्‍यांना इनव्हिटेशन टू बिड (आयटीबी) नुसार तीन विविध संघांवर बोली लावता येणार आहे. त्यात सर्वाधिक बोली लावणार्‍यास संघाचे मालकीहक्क दिले जातील. यासंबधीची कागदपत्रे मुंबई क्रिकेट संघटनेच्या चर्चगेट येथील कार्यालयात उपलब्ध आहेत. या निविदा 20 फेब्रुवारीपर्यंत एमसीएच्या कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत.