मुंबई । मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला आहे. मुंबईसह शेजारच्या ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार शनिवारी कायम आहे. पावसामुळे रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला. शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास समुद्राला भरती येणार असल्याने समुद्रकिनारी किनार्यावर धडकणार्या लाटांचा आनंद घेण्यासाठी जाणार्या नागरिकांना पालिका प्रशासनाकडून सर्तकतेचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी समुद्रात 4.62 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल 10 मिनिटे उशिरानं धावत होत्या. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले, तर गोरेगावच्या ओबेरॉय मॉलसमोर प्रचंड पाणी तुंबले होते. अंधेरीच्या मिलन सब-वेसह दादरच्या अनेक भागातही पाणी साचले होते. त्यामुळं या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळाले.
अहमदनगर । भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील रतनवाडीला अतिवृष्टीचा तडाखा तब्बल 306मिमी पाऊस कोसळला, भंडारदरा धरण 80 टक्के तर निळवंडे धरण 50 टक्के भरले. पांजरे, घाटघर, भंडारदरा, वाकी तेथेही मुसळधार पाऊस झाला.
नाशिक । जिल्ह्यातील काही भागांत पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळपासून दारणा 13980, गंगापूर 1664 भावली 1663 क्युसेक विसर्ग सुरू आहे.
नेरळ । कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या भिवपुरीजवळील आषाणे धबधब्यावर शनिवारी जाण्यासाठी लागणारा नाला पार करताना पाय घसरल्याने किरण प्रकाश बोराडे (36) यांची मुलगी तेजस किरण बोराडे (13) हिचा या नाल्यात पाय घसरून ती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेली. मुलीला वाचवण्यासाठी किरण बोराडे यांनी पाण्याच्या प्रवाहात उडी मारली. त्या प्रवासोबत दोघेही वाहत गेले. या दोघांचा शोध सुरू असतानाच सायंकाळी वडिलांचा मृतदेह बार्डी येथील ओढ्यात आढळून आला असून, मुलीचा शोध बचाव पथक घेत आहेत.
तुंगारेश्वरमध्ये 2 तरूण बुडाले
खानीवडे । वसईच्या तुंगारेश्वर येथील धबधब्याजवळ सहलीसाठी आलेले विलेपार्ले येथील दोन तरुण नदीत बुडाले. शुक्रवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता. सनी कनोजिया आणि चंद्रकांत गुप्ता अशी या दोन तरुणांची नावे आहेत. हे दोघे आपल्या मित्रासंह महाविद्यालयाला दांडी मारून आले होते. हे तरूण तुंगारेश्वर धबधब्याखालील नदीत उतरले होते. मात्र पाऊस असल्याने पाण्याचा प्रवाह वाढला आणि ते बुडू लागले. अग्निशमन दलाचे कर्मचारी त्यांचा शोध घेत होते. रात्री उशिरापर्यंत त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. मागिल रविवारीदेखील एका तरुणाचा तुंगारेश्वर डोहात बुडून मृत्यू झाला होता.
पाणीबाणीचे नो टेन्शन
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, वैतरणा, तुळशी, विहार आणि मोडकसागर हे तलाव भरून वाहू लागले आहेत. धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे तलावांमध्ये 11 लाख 76 हजार 479 दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला असून मुंबईकरांवरील पाणी संकट टळले आहे.
भुशीकडे जाण्यास नो एन्ट्री
जोरदार पावसाने लोणावळ्यातील भुशी धरणाचा परिसर, सहाराकडे जाणारा रस्ता व पार्किंग सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. गुरुवारपासून पावसाने वसईत धुमशान घातल्याने तानसा नदीवरील पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने या भागातील बारा गावांचा संपर्क तुटला आहे तसेच मेढे पुलावरून ही पाणी गेल्याने त्या पलीकडील आठ गाव ही संपर्काबाहेर राहिली.