ठाणे – मुंबई ते दिल्ली हा रस्ते मार्गाने होणारा प्रवास आता अवघ्या १२ तासात पूर्ण होणार आहे. मुंबई ते दिल्ली हे सुमारे दीड हजार किलोमीटर अंतर कापणाऱ्या बुलेट ट्रेनच्या बरोबरीला भव्य द्रुतगती महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग ८४८ वरील वडपे ते ठाणे या सुमारे २३ किमी अंतराचे आठ पदरीकरण, त्याचप्रमाणे शहापूर ते खोपोली या ९१ किमी रस्त्याचे चार पदरीकरण कामाचे ई भूमिपूजन आज गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई आणि महानगर क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी आगामी काळात जलवाहतुकीवर भर देण्यात येणार असून पुढील आठवड्यात यासंदर्भात यासंदर्भातील एक विस्तृत जल वाहतूक आराखड्यास मंजुरीची प्रक्रिया पार पडणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
नितीन गडकरी यांनी देखील बुलेट ट्रेनच्या तोडीस तोड असा १ लाख कोटी रुपये खर्चाचा आणि १२ तासांत मुंबई ते दिल्ली अंतर कापणाऱ्या भव्य द्रुतगती महामार्गाचे काम लवकरच सुरु होत आहे असे सांगितले. ठाणे जिल्ह्यातील ८ जेट्टींच्या कामांसाठी १०० कोटीस मंजुरी दिल्याची घोषणाही त्यांनी केली. हा पायाभरणी सोहळा भिवंडीनजीक दिवे अंजूर गाव येथे पार पडला.