मुंबई, देवळाली व नागपूर पॅसेंजर 23 पर्यंत रद्द

0

भुसावळ-भादलीदरम्यान तिसर्‍या लाईनसह नॉन इंटर लॉकिंगचे काम ; गर्दीच्या हंगामातील रेल्वेच्या निर्णयामुळे प्रवासी संतप्त

भुसावळ- तब्बल दिड महिन्यांपासून पॅसेंजर गाड्या रद्द झाल्याने रेल्वे प्रवासी संतप्त असतानाच पुन्हा 1 एप्रिल रोजी मुंबईसह देवळाली व नागपूर पॅसेंजर 23 एप्रिल पर्यंत रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतल्याने प्रवाशांच्या संतापात अधिकच भर पडली आहे. दरम्यान, गाडी क्रमांक 59078 व 59077 तसेच 59075-59076 या रात्री व सकाळी भुसावळातून धावणार्‍या सुरत पॅसेंजर 23 एप्रिलपर्यंत धरणगाव तसेच पाळधी येथून चालवण्याच रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. उन्हाळी सुट्यांमुळे आधीच रेल्वे गाड्यांना तोबा गर्दी असून त्यातच पॅसेंजर गाड्या रद्द झाल्याने नोकरदारांसह सर्वसामान्य गोरगरीब प्रवाशांचे अतोनात हाल आहेत.

सुरत पॅसेंजर पाळधी व धरणगावातून धावणार
भुसावळ येथून रात्री 9.15 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 59078 भुसावळ-सुरत व सुरत येथून दुपारी 4.45 वाजता सुटून भुसावळात रात्री 1.45 वाजता येणारी गाडी क्रमांक 59077 सुरत पॅसेंजर आता 1 ते 23 एप्रिलदरम्यान धरणगाव येथून सोडण्यात येईल तसेच परतीच्या प्रवासातही ही गाडी धरणगावपर्यंत धावणार आहे शिवाय भुसावळातून सकाळी 8.45 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 59076 भुसावळ-सुरत पॅसेंजर तसेच सुरत येथून सकाळी 7.15 ला सुटून भुसावळात सायंकाळी 7.20 वाजता येणारी गाडी क्रमांक 59075 सुरत-भुसावळ पॅसेंजर 1 ते 23 एप्रिल दरम्यान पाळधी येथून चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे किमान पश्‍चिम मार्गावरील प्रवाशांची काहीशी सोय होणार आहे.

तांत्रिक कामांमुळे पॅसेंजर रद्द
भुसावळ ते भादली सेक्शन दरम्यान तिसरी रेल्वे लाईन जोडण्याचे काम सुरू असून नॉन इंटरलॉकींगचेही काम केले जात आहे या शिवाय रेल्वेकडून मेंन्टेनन्स तसेच तांत्रिक कामे केली जात आहेत. विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आल्याने पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

मुंबईसह, देवळाली व नागपूर, कटनी पॅसेंजर रद्द
गाडी क्रमांक अप 51154 आणि डाउन 51153 भुसावळ-मुंबई पॅसेंजर 1 ते 23 एप्रिलदरम्यान रद्द करण्यात आली आहे तर गाडी क्रमांक अप 51182 व डाउन 51181 भुसावळ-देवळाली पॅसेंजर 1 ते 23 एप्रिल तसेच गाडी क्रमांक अप 51286 व डाउन 51285 भुसावळ-नागपूर पॅसेंजर 1 ते 23 एप्रिलपर्यंत रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. दरम्यान, 2 एप्रिल रोजी भुसावळ रेल्वे यार्डात तांत्रिक ब्लॉक घेण्यात येत असून डाऊन 51187 भुसावळ-कटनी रद्द करण्यात आली असून 3 रोजी देखील 51188 कटनी-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे.

गर्दीच्या हंगामात रेल्वे प्रवाशांना मनस्ताप
मुंबई, देवळाली, नागपूर तसेच सकाळी व रात्री सुटणारी सूरत पॅसेंजर या पाच गाड्या 15 फेब्रुवारीपासून मेंटेनन्सच्या कामांसाठी रेल्वेने रद्द केल्या होत्या तर 1 एप्रिलपासून या गाड्यांची सेवा पूर्ववत होण्याची अपेक्षा फोल ठरली. तब्बल दिड महिन्यांपासून भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांना या गाड्या सुरू होण्याची अपेक्षा असलीतरी गाड्या सुरू होत नसल्याने रेल्वे प्रवाशांचे अतोनाल होत आहे. प्रवाशांसह चाकरमान्यांना एक्स्प्रेस गाड्यांसह बसेसने प्रवास करावा लागत असल्याने वेळेसह पैशांचा मोठा भूर्दंड सोसावा लागत आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा आणि ऐन लग्नसराईत पॅसेंजर गाड्या रद्द केल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध प्रचंड नाराजी व्यक्त होत
आहे.