मुंबई पालिकेचा आज होणार अर्थसंकल्प सादर

0

मुंबई : पालिका आयुक्त अजोय मेहता स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांना महसुली उत्पन्नावर आधारित व करवाढ नसणारा अर्थसंकल्प आज बुधवारी सादर करणार आहेत पालिकेचे महसुली उत्पन्न 32 हजार कोटी रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे यामुळे अर्थसंकल्प हा 32 हजार कोटी रुपयांचा असणार आहे. अर्थसंकल्प कमी करून नागरिक खुश होतील असे नव्हे, जी तरतूद केली जाते त्यापैकी २३ ते ३० टक्के रक्कमच खर्च केली जाते. हि तरतूद केलेली सर्व रक्कम खर्च करून नागरिकांना चांगल्यात चांगल्या सुविधा देण्यासाठी तसेच बँकांमध्ये ६१ हजार कोटी रुपयांच्या ठेवीवर दरवर्षाला ४५०० कोटी रुपयांचे जे व्याज मिळत आहे हि रक्कम सुद्धा नागरिकांना देण्याची सोय असणारा अर्थसंकल्प  असणार आहे सत्ताधारी शिवसेना व भाजपा हे दोन्ही मित्र पक्ष एकत्र सत्तेत असताना फुगत चाललेल्या अर्थसंकल्पाबाबत हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून होते. या महापालिका निवडणुकी आधी दोघांची युती तुटल्याने आता दोन्ही पक्ष आमने सामने आले आहेत. नागरिकांचा आम्हीच चांगला विचार करतो हे दाखवण्याची स्पर्धा सुरु आहे. शिवसेना आणि भाजपामधील या स्पर्धेमुळे नागरिकांचा मात्र आपोआप फायदा होऊ लागला आहे. महापालिकेचे वर्षानुवर्षे फुगवून दाखवलेले बजेट यावर्षी महसुली उत्पन्नावर आधारित असणार आहे त्यामुळे पालिका आयुक्त अजोय मेहता कोणाच्या बाजूने आपला जास्त कल दाखवणार याकडे सर्व मुंबई करांचे लक्ष लागले आहे हा अर्थसंकल्प  सत्ताधारी शिवसेना कि भाजपाच्या बाजूचा असणार आहे हे उद्याच कळणार आहे

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे ही नगरी प्रसिद्ध आहे. जागतिक दर्जाचे शहर म्हणून दर्जा प्राप्त असलेल्या या शहराकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असते. जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईला नागरी सुविधा देण्याचे काम मुंबई पालिका करते. नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी नागरिकांकडून कर गोळा केला जातो. या कर रुपी महसूलामधील आकडेवारीची फोडाफोडी करून पालिका प्रशासन अर्थसंकल्प तयार करत असते. अर्थसंकल्पात महापालिका आपल्या विविध विभागांसाठी निधीची तरतूद करून देते. हा निधी संबंधित विभागाने नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी खर्च करणे अपेक्षित असते. मात्र मंजूर केलेली रक्कम खर्चच केली जात नसल्याचे गेले अनेक वर्षे समोर येत आहे मुंबईकर नागरिकांवर विविध कर लावून महापालिका प्रशासन आपला महसूल जमा करत असते.

पालिकेच्या बहुतेक विभागासाठी अर्थसंकल्पात जी तरतूद केली जाते त्या पैकी २३ ते ३० टक्के इतकाच निधी खर्च होत असतो पालिकेकडे अर्थसंकल्पात तरतूद केलेला परंतू खर्च न झालेला निधी पडून राहत आहे. पालिका प्रशासन तरतूद केलेला निधी खर्च करण्यात अपयशी ठरत असल्याने खर्च न झालेला हा निधी बँकांमध्ये ठेवी रूपाने जमा केला जात आहे. सध्या मुंबई पालिकेचे विविध बँकांमध्ये ६१ हजार करोड रुपये ठेवीच्या माध्यमातून जमा आहेत. महापालिका प्रशासन तरतूद केलेला निधी खर्च करू शकत नसताना गेल्या कित्तेक वर्षात संबंधित विभागांना निधी वाढवून का दिला जात आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे पालिकेच्या अर्थसंकल्पावर नजर टाकल्यास आज पासून दहा वर्षा पूर्वी सन २००७ – २००८ ला १२,८७७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर झाला होता. सन २००८-२००९ त्यात ४ हजार कोटी रुपयांची वाढ होऊन त्यावर्षी १६,७९२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला गेला. पुन्हा सन २०१०-२०११ मध्ये ४ हजार कोटी रुपयांची वाढ होऊन २०,४१७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सन २०११-२०१२ मध्ये अर्थसंकल्पात जास्त वाढ न होता २१,०९६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सन २०११-२०१२ नंतर अर्थसंकल्प पुन्हा करोडो रुपयांनी वाढू लागला. सन २०१२-२०१३ मध्ये २६,५८१ कोटी रुपयांचा, सन २०१३-२०१४ मध्ये २७,५७८ कोटी रुपयांचा, सन २०१४-१५ मध्ये ३१,१७८ कोटी रुपयांचा, सन २०१५-१६ मध्ये ३३,५१४ कोटी रुपयांचा तर सन २०१६ -१७ मध्ये ३७ हजार कोटी ५२ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

मुंबई पालिकेच्या सन २०१६ – १७ चे अर्थसंकल्पीय आकारमान ३७,०५२ कोटी रुपये तरी महसुली उत्पन्नाचे अंदाज २५६४२ कोटी रुपये होते. सन २०१५ -१६ चा अर्थसंकल्प ३३,५१४ कोटी रुपयांचा होता त्यावेळीही महसूली उत्पन्न २३५०९ कोटी रूपये अपेक्षित होते. महापालिकडे जो महसूल येतो त्यावर आधारित अर्थसंकल्प सादर केला गेला असता तर अर्थसंकल्पातील आकडे फुगत गेले नसते. परंतू मुंबई महापालिकेद्वारे सादर केल्या जात असलेल्या अर्थसंकल्पात अनेक वेळा इतर ठिकाणाहून कर्ज घेतल्याचे दाखवून किंवा महापालिकेच्या बँकांमध्ये जमा असलेल्या रक्कमेमधून निधी काढून तर कधी कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंड मधील पैसे घेऊन काही प्रोजेक्टसाठी तरदूत दाखवत अर्थसंकल्प सादर करते

अर्थसंकल्पात एखाद्या प्रोजेक्टसाठी एकदा तरतूद केली कि तो प्रोजेक्ट अस्तित्वात आला नसला तरी ती तरतूद दरवर्षी वाढत गेली. अर्थसंकल्पात प्रोजेक्टसाठी करोडोंचा निधी दाखवला जात असताना अनेक प्रोजेक्ट कागदावरच राहिले आहेत. अश्या कागदावरील प्रोजेक्टमुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकडा मात्र फुगत गेला. आता या फुगलेल्या अर्थसंकल्पाला चाप लावण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. पालिकेत गेले २५ वर्षे सत्तेत असलेले शिवसेना आणि दोन्ही पक्ष आपली युती तुटल्याने आपणच कसे नागरिकांच्या हिताचे काम करतो हे दाखवू लागले आहेत. शिवसेनेच्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी वास्तववादी अर्थसंकल्प सादर करावा अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.शिवसेनेने वास्तववादी अर्थसंकल्प सादर करण्याची मागणी केल्यावर भाजपाच्या मुंबई अध्यक्ष असलेल्या आमदार आशिष शेलार यांनीही पालिका आयुक्तांना पत्र देऊन नागरिकांवर कोणताही कर लावू नये अशी मागणी केली आहे.

भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी वास्तववादी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पारदर्शक पणा असायला हवा. पारदर्शी अर्थसंकल्पच वास्तववादी असेल असा टोला शिवसेनेला व महापौरांना लगावला आहे. डबेवाला भवन, गारगाई, कोस्टल रोड यासारखे अनेक प्रकल्प ज्यासाठी दरवर्षी करोडो रुपयांची तरतूद केली जाते मात्र हे प्रकल्प आजही अस्तित्वात आलेले नाहीत. जे प्रकल्प अस्तित्वात आले नाहीत किंवा ज्यांना मंजुरी मिळालेली नाही त्यासाठी तरतूद करून अर्थसंकल्प का फुगवयाचा असा प्रश्न कोटक यांनी उपस्थित केला आहे. पालिका दरवर्षी अर्थसंकल्प  फुगून सादर करते मात्र यंदाचा अर्थसंकल्प  पालिकेच्या इतिहासात प्रथमच पालिका अर्थसंकल्प  कमी करून सादर करण्याची शक्यता आहे तब्बल 10 हजार कोटी कमी करून अर्थसंकल्प  सादर करण्याची शक्यता आहे त्यामुळे पालिका आयुक्त कोणाच्या बाजूचा अर्थसंकल्प  सादर करणार याकडे सवॅ मुंबईकरांचे लक्ष लागले आहे