खालापूर : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पानशील गावाजवळ बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास इको कार झाडावर आदळली. या अपघातात 2 महिलांसह 9 वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर 5 जण गंभीर जखमी झाले. जखमींना पनवेल येथील एम.जी.एम.रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील सर्व जण मुंबईतील बाणडोंगरी येथील रहिवाशी आहेत.
पुण्याहून मुंबईकडे जाणार्या इको कारचालकाचा गाडीवरील ताबा झोपेच्या धुंदीत सुटला. त्यामुळे कार झाडावर आदळली. कारची धडक इतकी जोरात होती की धडक दिलेले झाड उन्मळून पडले. मृतांमध्ये 2 महिला तसेच एका लहान मुलीचा समावेश आहे. ललाबी मोइद्दीन मुजावर (40), रुक्साना शाबुद्दीन शेख (30), तर आलिया शाबुद्दीन शेख (9 रा.बाणडोंगरी,मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये 4 लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेत कारचालक तसेच आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे.