मुंबई-पुणे द्रूतगती मार्ग पुन्हा खोळंबला

0

मुंबई: मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असते, त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक नेहमीच खोळंबत असते. शनिवार महामार्गावर ऑइलच्या टँकरमधील तेल सांडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. दुपारपासून हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येवू लागली. मात्र तोवर मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.

या महामार्गावर अमृतांजन पूल ते खंडाळा बोगदा या 500 मीटर रस्त्यावर ऑइल सांडल्याने शनिवारी सकाळ पासूनचा वाहतूक बंद ठेवण्यात आली. त्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणार्‍या वाहनांच्या रांगा 4 ते 5 किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या. त्यावेळी महामार्गावर सांडलेले तेल हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले, मात्र तोवर मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. आज शनिवार असल्याने उद्याची सुट्टी पाहून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या गाड्यांची संख्या जास्त असते. अशा प्रकारे विकेंडला एक्स्प्रेस वेवर नेहमीच ट्रॅफिक जाम होत असते, मात्र या वेळी उन्हाळी सुट्टी असल्याने नेहमीच्या तुलनेत महामार्गावर वाहनांची अधिक गर्दी होती. त्यातच महामार्गावर ऑईल सांडल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला.