मुंबई: करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेला देशव्यापी लॉकडाऊन येत्या १४ एप्रिल रोजी संपत असला तरी महाराष्ट्रात हा कालावधी काही आठवड्यांनी वाढवला जाऊ शकतो, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांच्या बाबतीत तसा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
राज्यात शुक्रवारी ६७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाल्याने आतापर्यंत करोना रुग्णांचा आकडा ४९० वर पोहोचला आहे. तर, २६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. देशात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात असल्याने राज्य सरकारची डोकंदुखी वाढली आहे. यातही मुंबईत करोनाचा संसर्ग रोखणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. सध्याच्या लॉकडाऊनमुळे हळूहळू संसर्गाचं प्रमाण आणि रुग्णांची संख्या कमी होईल अशी आशा आहे. मात्र, आजघडीला तरी आकडा वाढताना दिसतोय. त्यामुळे लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागणार आहे. अर्थात, हा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये लगेचच लॉकडाऊन मागे घेतला जाऊ नये, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे टोपे म्हणाले.